त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांबद्दल काही रोचक तथ्ये


मेघालय राज्यामध्ये ट्रेकिंग, केव्हिंग, रॉक क्लाइम्बिंग, हँड ग्लायडिंग, आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटण्यासाठी अनेक ठिकाणे तुम्हाला सापडतील. या राज्याची राजधानी शिलॉंग ‘ स्कॉटलंड ऑफ द इस्ट ‘ म्हणून ओळखली जाते. निसर्गाच्या वरदहस्त लाभलेले असे हे राज्य आहे. मेघालय एके काळी आसाम या राज्याचा भाग असून, १९७२ साली खासी, गारो आणि जैंतिया हिल्स हे जिल्हे वेगळे करून मेघालय राज्याचे निर्माण झाले. मेघालयची आधिकारिक भाषा इंग्रजी असून, गारो, खासी आणि पनार या राज्यातील प्रमुख भाषा आहेत. मेघालयातील सुमारे सत्तर टक्के भाग घनदाट अरण्याने व्यापलेला आहे. त्याचमुळे हे राज्य आशिया खंडातील सर्वात सुपीक जमीन असलेले राज्य म्हणून ओळखले जाते.

त्रिपुरा हे भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे. ह्या राज्यामध्ये रेल्वेचे जाले केवळ ६६ किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. बंगाली आणि त्रिपुरी भाषा ‘कोक बरोक’ या राज्यातील प्रमुख भाषा आहेत. पण बहुतेक नागरिक बंगाली भाषेचा वापर करताना दिसतात. येथील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हातमागावर कपडा विणणे हा आहे. दुर्गापूजा या राज्यातील मुख्य उत्सव असून, हा सण संपूर्ण राज्यभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या राज्यातील अगरतला, उदयपुर, त्रिपुरा सुंदरी मातेचे देवस्थान, नील महाल, जामपुई हिल, सेफाजाला, पिलक, आणि महामुनी ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.

मेघालय राज्याप्रमाणेच नागालँड हे राज्य देखील एके काळी आसाम राज्याचा भाग होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या काळी नागा जमातीला देखील स्वतःची ओळख असावी, त्यांच्या जमातीचा सर्वांगीण विकास व्हावा अशी इच्छा होती. त्यांची ही इच्छा लक्षात घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९६३ साली नागालँड या राज्याला औपचारिक मान्यता देण्यात आली. नागालँड मध्ये १६ निरनिराळ्या स्थानिक जनजाती आहेत. यामध्ये अंगामी, आओ, चखेसंग, चांग, दिमासा कचारी, खियमनिन्गान, कोनयाक, लोथा, फोम, पोचुरी, रेन्गमा, संगतम, सूमी, इंचुन्गेर, कुकी आणि जेलीयांग या जनजातींचा समावेश आहे. हे राज्य पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते. या राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणे अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहेत. नागालँड मधील माउंट सरामती हा सर्वात उंच पर्वत असून याची समुद्र सपाटीपासून उंची ३८४० मीटर आहे.

Leave a Comment