वर्क आउट पूर्वी कॉफी पिणे योग्य आहे का?


अनेक वेळा जिममध्ये वर्क आउट सुरू करण्याआधी काही व्यक्ती कॉफीचे सेवन करीत असलेल्या आपण पाहतो. शरीरातील चयापचय, म्हणजेच मेटाबोलीझम वाढविण्याकरिता कॉफीचे सेवन सहायक आहे. अॅथलिट आणि ऑलीम्पिक चँपियन मोहम्मद फराह यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये, आपल्या प्रत्येक वर्क आउटच्या वीस मिनिटे आधी आपण कॉफी पीत असल्याचा उल्लेख केला आहे. कॉफीच्या सेवनाने शरीराची थकावट जाऊन शरीरामध्ये उर्जा निर्माण होत असल्याने आपण कॉफीचे सेवन करीत असल्याचे फराह यांचे म्हणणे आहे.

कॉफीमध्ये असलेले कॅफिन उर्जेचे उत्तम स्रोत आहे, त्यामुळे कॉफीच्या सेवनाने शरीरातील उर्जा टिकून रहाते आणि मेंदू व मन सजग राहतात. त्यामुळे वर्क आउट पूर्वी कोणत्याही प्रकारचे कृत्रिम एनर्जी ड्रिंक न घेता, वर्क आउट पूर्वी अर्धा तास कॉफी घेण्याचा सल्ला फिटनेस एक्स्पर्ट देतात. ज्या व्यक्ती कृत्रिम एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करीत असतील, त्यांच्या शरीराला ह्या ड्रिंक्सचे सवय जडते, आणि त्यामुळे ह्या ड्रिंक्सने मिळत असलेल्या उर्जेशिवाय त्यांचे शरीर कालांतराने काम करेनासे होते. म्हणून एनर्जी ड्रिंक्सऐवजी कॉफीचे सेवन हा चांगला पर्याय असल्याचे फिटनेस एक्स्पर्ट्सचे म्हणणे आहे.

कॉफी, हा आपला वर्क आउट सुरु करण्यापूर्वी घेण्यासाठी चांगला पर्याय आहे. पण त्याचबरोबर ही कॉफी कशी बनविली जाते हे पाहणेही तितकेच गरजेचे आहे. खूप दुध आणि साखर घातलेली कॉफी न पिता, अर्धा चमचा कॉफी पावडर, त्यामध्ये चिमुटभर दालचिनीची पूड आणि मग त्यावर आपल्याला लागेल तितके गरम पाणी घालून घेऊन ही कॉफी तयार करावयाची आहे. त्याचप्रमाणे आपण सेवन करीत असलेल्या कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी काही तासांचा अवधी आवश्यक असतो. ते कॅफिन आपल्या शरीरात असेपर्यंत आपल्या शरीरामध्ये उर्जेचा संचार होत असतो, आणि मेंदूदेखील सक्रीय राहत असतो. त्यामुळे रात्री झोपण्याआधी कॉफीचे जास्त सेवन करू नये, अन्यथा शांत झोप न लागण्याची शक्यता उद्भवते. तसेच कॉफीमध्ये दुधाचा वापर करायचाच असेल, तर लो फॅट दुध, आल्मंड मिल्क, किंवा सोया मिल्कचा वापर करावा. या कॉफीमध्ये साखरेचा वापर शक्यतो करू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment