पत्नीची ड्यूटी


घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे. तसा विचार केला तर होत असलेले घटस्फोट फार आहेत असे नाही पण ज्या समाजात घटस्फोट होतच नाहीत त्या समाजात ते काही लहान प्रमाणात का होईना व्हायला लागले आहेत. मात्र होत असलेल्या घटस्फोटांची कारणे मात्र विचित्र आहेत. मुंबईच्या एक घटस्फोटाच्या प्रकरणात मटण कसे शिजवावे हा वादाचा मुद्दा होता. पत्नी मटण कुकरमध्ये शिजवत होती तर ते शेगडीवर शिजवावे असा पतीचा आग्रह होता. या मुद्यावर सुनावणी सुरू झाली तेव्हा हे कारण पाहून न्यायाधीशांच्या डोळ्यात पाणी आले. अशा किरकोळ कारणाने घटस्फोट घेणे बरे नाही असे त्यांनी त्या जोडप्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण दोघेही आपल्या हट्टावरून सुतभरही मागे सरकायला तयार झाले नाहीत. त्यावर घटस्फोट मान्य करावा लागला.

गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात असेच एक प्रकरण आले. बायको लवकर उठत नाही. चांगला स्वयंपाक करीत नाही. आपल्या आई वडिलांना नीट खायला घालत नाही. आपण कामावरून येतो तेव्हा एक ग्लासभर पाणीही देत नाही अशा तक्रारी करीत एक नवरोबाने घटस्फोट मागितला. पण कुटुंब न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली. पत्नीचे हे वागणे म्हणजे क्रूरपणा नाही. तेव्हा घटस्फोट मान्य करता येत नाही असा निकाल न्यायालयाने दिला. त्यावर या नवर्‍याने उच्च न्यायालयात धाव घेतली पण उच्च न्यायालयानेही खालच्या न्यायालयाचा निकाल कायम केला. या प्रकरणातील पत्नी ही नोकरी करीत होती. तीही कामावरून थकून सहा वाजता येत होती. ती घरी येताना भाजी आणि किराणा माल खरेदी करून येत होती. तेव्हा तिने नवर्‍याला पाण्याचा ग्लास द्यावा ही मागणी योग्य नाही.

नवरा बाहेर कष्ट करून येतो म्हणून त्याने बायकोवर रुबाब करावा आणि तिच्याकडून काही अपेक्षा कराव्यात हे ठीक आहे पण इथे तर नवर्‍याबरोबर बायकोही नोकरी करीत आहे. अशा वेळी नवर्‍यानेच तिला पाण्याचा ग्लास दिला पाहिजे. किमान स्वत:ला पाणी हवे असेल तर स्वत:च्या हाताने घेतले पाहिजे. आपल्या समाजात पतीला अर्थार्जन आणि पत्नीला घरकाम अशी वाटणी केली आहे. ती एकवेळ मान्य करता येईल पण पत्नी अर्थार्जन करीत असली तरी घरकामही तिनेच केले पाहिजे असा आग्रह धरला जातो. आपल्या समाजात महिलांनी ही दुहेरी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्या नोकरी करीत असल्या तरी स्वयंपाकही करतात पण त्यात काही कसूर झाली तर तिला लगेच घटस्फोट दिला जावा हे अजीबातच न्याय्य नाही.

Leave a Comment