जीएसटी जमा न करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक


मुंबई – जीएसटी कायदा अमलात आल्यानंतर पहिल्यांदाच या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून मुंबईतील २ व्यापाऱ्यांना या कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’च्या घोटाळा प्रकरणातील आरोपाखाली ही कारवाई जीएसटी अधिकाऱ्यांनी केली आहे.

शाह ब्रदर्स इस्पात प्रा.लिमिटेडचे संचालक संजीव मेहता आणि व्ही.एन. इंडस्ट्रीचे संचालक विनयकुमार आर्या या दोघांचा जीएसटी कायद्यान्वये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत मुंबई जीएसटीचे आयुक्त डॉ. के. एन. राघवन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुठल्याही मालाचा पुरवठा न करता फक्त कागदावरच व्यवहार दाखवून इनपुट टॅक्स क्रेडिट जमा करण्याचा आरोप या दोन्ही आरोपींवर आहे.

५ कोटी २० लाख आरोपी संजीव मेहता यांच्यावर आणि २ कोटी ३ लाख विनयकुमार आर्या यांच्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट जमा न करण्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी विनय कुमार आर्या याने जीएसटी नियमान्वये रक्कम भरल्यानंतर त्याला जीएसटी कार्यालयातून जामीन मिळाला. तर संजीव मेहता यास न्यायालयात हजर करून त्या ठिकाणी रक्कम भरल्यानंतर जामीन मिळाला आहे.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार कागदावरच बनावट व्यवहार दाखवून टॅक्स इनपुट क्रेडिट दोन्ही व्यापाऱ्यांनी वाढवले होते. जेणेकरून त्यांच्याजवळ जमा होणाऱ्या पैशांच्या आधारावर लेटर ऑफ क्रेडिट दाखवून हे दोघे बँकांना फसविण्याच्या प्रयत्नात होते. जीएसटी अधिकाऱ्यांना संशय आहे, की अशाच प्रकारे अनेक व्यापारी अशा प्रकारची फसवणूक करत आहेत.

Leave a Comment