चिदंबरम यांची मालमत्ता


कार्ती चिदंबरम आणि छगन भुजबळ या दोघांचा मालमत्ता कमावण्याचा इतिहास समान आहे. सीबीआय ने आता कार्ती चिदंबरम याच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात त्याच्यावर असलेले आरोप नमूद केले आहेत. त्यानुसार या चिरंजीवांनी देशात आणि परदेशात बापाच्या प्रतिष्ठेचा वापर करून केवळ कोट्यवधींचीच नाही तर अब्जावधींची मालमत्ता कमाविली आहे. या मालमत्तांची यादी पाहिली तरी आपले डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत. चिदंबरम यांची केवळ चेन्नई शहरात १२ घरे आहेत. ४० मॉल्स, १६ चित्रपट गृहे आणि तीन कार्यालये त्यांच्या मालकीची आहेत. या कुटुंबाने तामिळनाडूत ३०० एकर जमीन कमावलेली आहेे. देशभरात त्यांची ५०० रुग्णालये आहेत.

या महोदयांनी कोणताही धंदा करायचा बाकी ठेवलेला नाही. देशातल्या अपवादानेच कोणी रुग्णवाहिका हा गुंतवणुकीचा मार्ग म्हणून स्वीकारला असेल पण चिदंबरम यांनी राजस्थानात हा धंदा केला आहे आणि केवळ राजस्थानात त्यांच्या २ हजार रुग्णवाहिका आहेत. आता आपले तामिळनाडू सोडून त्यांनी राजस्थानात हा व्यवसाय का सुरू केला असेल यावर प्रकाश पडला पाहिजे आणि त्यांचा हा व्यवसाय तिथे सुरळीत चालावा यासाठी तिथे असलेल्या अशोक गहेलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काही मदत केली आहे का याची चौकशी करावी लागेल. बाहेर देशातही त्यांच्या मालमत्ता आहेत. ब्रिटनमध्ये ८८ एकर जमीन आहे.

श्रीलंकेतल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तीन रिसॉर्ट मध्ये चिदंबरम यांचे शेअर्स आहेत. मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर येथील काही इमारतींमध्ये त्यांची भागीदारी आहे. स्पेनमध्ये त्यांनी बार्सिलोना येथे टेनिसच्या मैदानात गुंतवणूक केलेली आहे. त्यासाठी चार एकर जमीन खरेदी केलेली आहे. दुबई आणि फ्रान्समध्येही त्यांची जागा आणि इमारतींमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक आहे. त्यांच्या गुंतवणुका असलेल्या देशांची यादी मोठी आहे. द.आफ्रिका, फिलिपाइन्स, स्वित्झर्लंड, फ्रान्स, अमेरिका या देशातली त्यांची मालमत्ता करोडो रुपयांची आहे. ती सारी मालमत्ता त्यांनी २००६ सालपासून कमाविलेली आहे. परदेशातल्या काही बांधकाम व्यावसायिकांशी त्यांनी भागिदारीही केली आहे. एवढी मालमत्ता कमावूनही त्यांचे समाधान झाले नाही पण त्यांचा आणखी मालमत्ता कमावण्याचा सपाटा सुरूच आहे. शेवटी माणसाला साडे तीन हात जमीनच लागत असते याचे भान अशा लोकांना का नसते याचे नवल वाटते.

Leave a Comment