
आपण महाशक्ती होण्याची कितीही स्वप्ने पहात असलो तरीही आपल्या देशात महिला आणि बालकांची स्थिती म्हणावी तशी नाही. महिलांमध्ये आणि बालकांमध्ये अशक्ततेचे प्रमाण मोठे आहे. या बाबत जागतिक स्तरावर काही पाहणी होते तेव्हा नेहमीच भारताचा क्रमांक बराच खाली असल्याचे दिसते. आता आता युनिसेफने जगातल्या ५० देशांची पाहणी करून बालकांतल्या कुपोषणाच्या बाबतीत भारताचा क्रमांक १२ वा असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बालकांच्या कुपोषणावर उपाय म्हणून स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे पण तिचे लाभ अजूनही पात्र कुटुंबांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे विविध राज्यांत कुपोषित मुलांची संख्या मोठी असल्याचे त्या त्या सरकारच्या पाहणीतूनही दिसून येत आहे.
कुपोषणाचे बळी
साधारणत: लहान मुलांना सकस आहार मिळत नाही आणि त्यामुळे ती कुपोषित राहतात असे सकृत्दर्शनी दिसते. ते काही खोटे नाही. कारण शेवटी कुपोषण म्हणजे पोषणाचा अभाव हे तर उघडच आहे. पण कुपोषणाला अनेक कारणे आहेत. राजस्थानात गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या एका पाहणीत असे आढळून आले आहे की, राज्यातली ३५ टक्के मुले आणि मुली प्रमाणापेक्षा कमी वजनाची आहेत. हा काही खायला कमी मिळण्याचा प्रकार नाही. राजस्थानात लहान वयात विवाह करण्याची प्रथा सर्रास रूढ आहे. मुलींंचे विवाह लहान वयात होतात आणि त्यांनी वयाची सोळा सतरा वर्षे पुरी करण्याच्या आतच त्यांना मूलही होते. तिचे शरीर सुदृढ मुलाला जन्म देण्यास सक्षम होण्याच्या आतच तिला मातृत्व प्राप्त होते. परिणामी तिला होणारे मूल कमी वजनाचे असते आणि त्याला कितीही आहार मिळाला तरीही वजनातली ही कमतरता कायम राहते.
असे प्रकार टळावेत यासाठी पौगंडावस्थेतल्या मुलींना विवाहाच्या आधीच चांगला आहार दिला गेला पाहिजे. या दृष्टीने किशोरींना लक्ष्य केले पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही मुले खायला मिळूनही सतत कोणत्या ना कोणत्या साथीच्या रोगाला बळी पडतात. त्यातल्या त्यात हगवणीची साथ नेहमीच असते. देशातली ५० टक्के बालके कधीनाकधी अशा साथीला बळी पडलेली असतात. या साथीत मुले मरण पावत नाहीत पण अशक्त होतात आणि नंतर अंग धरत नाहीत. अशा रोगांना ती बळी पडू नयेत यासाठी त्यांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. जेवणाआधी हात धुतले पाहिजेत, संडास बांधले पाहिजेत, शौचावरून आल्यानंतर साबणाने हात धुतले पाहिजेत अशा सवयी लागल्यास त्यांचा कुपोषणाच प्रश्न मिटेल.
