टीव्हीसमोर बसून भोजन करण्याची सवय अपायकारक


आजकाल घरामध्ये संपूर्ण परिवार जेवण्याच्या वेळी एकत्र फार कमी वेळा पाहायला मिळतो, घरातील बहुतेक मंडळी आपापल्या उद्योगांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या जेवणाच्या वेळा देखील वेगवेगळ्या असतात. घरातील वडील मंडळी दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्याने, व कामावर जाण्यासाठी घरातून लवकर बाहेर पडावे लागत असल्याने त्यांचा सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण बहुतेकवेळी बाहेरच असते. शाळा- कॉलेजमध्ये जाणारी मुळे देखील दुपारच्या जेवणासाठी बहुतेक वेळी घरामध्ये नसतात. त्यामुळे पुष्कळदा घरातील सर्व मंडळींची गाठ, रात्रीच्या जेवणाच्या वेळीच पडते. त्यातूनही एकत्र भोजन घेत असले, तरी प्रत्येक जण जेवता जेवता आपल्या मोबाईलवरचे न्यूज फीड, मेसेजेस बघण्यात दंग असतो. तसेच, आजकाल संध्याकाळचे जेवण बहुतेक वेळी टीव्हीवर मालिका किंवा इतर काही कार्यक्रम पाहता पाहता पार पडत असते. हे सवय कितपत चांगली आहे?

मोबाईलफोन किंवा टीव्हीवर भरमसाट वाहिन्या येण्यापूर्वीच्या दिवसातील जीवन किती साधे होते.. टीव्ही हा एखादी मालिका किंवा बातम्या पाहण्यापुरताच सुरु होत असे. लहान मुलांकरिता टीव्ही पाहण्याच्या वेळेवर काटेकोर बंधने असत. दिवसभर सर्व जण कामानिमित्त बाहेर असले तरी संध्याकाळचे भोजन एकत्र, एकमेकांशी गप्पा करीत पार पडत असे. याचे अनेक फायदे असत. एक तर पानामध्ये असलेल्या प्रत्येक पदार्थाचा मनापासून आस्वाद घेतला जाई. आताच्या यंत्रयुगामध्ये आपले भोजन घेण्याची पद्धत देखील यंत्रवत झाली आहे. बहुतेकवेळा काही ना काही कामांची घाई असल्याने निवांत बसून सावकाश जेवणे आपल्याला जमेनासे झाले आहे.

टीव्हीसमोर बसून भोजन केल्याने, आपले लक्ष भोजनाकडे कमी आणि टीव्हीवरील मालिकेकडे जास्त असते. त्यामुळे आपण नेमके किती खातो आहे, कसे खातो आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो. हीच सवय वजन वाढण्यास कारणीभूत असते. आहारतज्ञांच्या मते भोजन करताना ते शांत मनाने केले जाणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक घास सावकाश चावून खाल्ल्याने भूक लवकर शमते व त्यामुळे आपोआपच अन्न कमी खाल्ले जाते. भोजन करताना अन्य कोणत्याही प्रकारे चित्त विचलित होऊ न देता एकाग्रतेने भोजन करावे. भोजन योग्य प्रकारे केल्याने पचन व्यवस्थित होते.

आपल्या परिवारातील मंडळींसोबत एकत्र बसून भोजन करणे, ही एकमेकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे टीव्हीसमोर बसून भोजन न करता, आपल्या परिवारासोबत एकत्र बसून भोजनाचा आनंद घ्या. एकमेकांशी संवाद साधा, दिवस कसा गेला याची विचारपूस करा, घडामोडींची चर्चा करा. अश्या प्रकारच्या संवादाने दिवसभराचा थकवा आणि कामांमुळे मनावर आलेला ताण दूर पळून जाईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment