मोरारजींचे स्मरण


कालच मराठी मायबोली दिन साजरा झाला. फेसबूक आणि फेसबूकसारख्या सोशल मीडियावर मराठी दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. आलेल्या शुभेच्छा वाचणे आणि त्यांना यथायोग्य उत्तर देणे यातच बर्‍याच लोकांचा कालचा दिवस गेला. आज विज्ञान दिन आहे. हाही दिवस महत्त्वाचाच आहे. परंतु मराठी दिनाच्या तुलनेने अगदी नगण्य इतक्या प्रमाणात विज्ञान दिनाच्या शुभेच्छांची देवाण घेवाण झाली. मराठी दिनासारखा उत्साह विज्ञान दिनाला का जाणवला नाही असा प्रश्‍न कोणाला पडेलही परंतु आपल्या आयुष्यात आपण विज्ञानाला किती महत्त्व देतो हे यावरून दिसून आले आहे. आज भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचीही जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या विषयीसुध्दा थोडे जाणून घेतले पाहिजे.

मोरारजी देसाई हे स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून १९७८ पर्यंत म्हणजे जवळपास ३५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रिय होते. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. नंतर ते केंद्रात अर्थमंत्री, गृहमंत्री आणि उपपंतप्रधानसुध्दा झाले. कॉंग्रेस पक्षात इंदिरा युगाचा प्रारंभ झाल्यानंतर मोरारजी काही दिवस उपेक्षित राहिले परंतु इंदिरा गांधींच्या कुप्रसिध्द आणीबाणीनंतर झालेल्या जनता पार्टीच्या प्रयोगात मोरारजी पंतप्रधान झाले. ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे वय ८३ वर्षे होते. परंतु अतीशय तत्वनिष्ठ आणि नैष्ठिक जीवन जगणार्‍या मोरारजी देसाई यांच्या कणखर नेतृत्वाखाली जनता पार्टीचे सरकार छान काम करायला लागले. मोरारजींचा वाढदिवस २९ फेब्रुवारी त्यामुळे तसा तो दर चार वर्षाला एकदा येतो. आयुष्याच्या शेवटपर्यंत मोरारजी दररोज एक तास सूत कताई करत होते.

मोरारजी आपल्या आयुष्यात कधी गादीवर झोपले नाहीत. ते जेवत नसत. सकाळी एक कप दूध, मोजकेच काजू आणि केळी असा त्यांचा आहार असे. दुपारच्या वेळी थोडे पेंडखजूर थोडे दूध असा त्यांचा आहार असे. आयुष्याची जवळजवळ ६० वर्षे ते अशाच आहारावर जगले. परंतु ते कणखर होते. वयाची ८० वर्षे ओलांडलेली असूनही ते तीन तीन – चार चार तास खुर्चीवर ताठ बसत असत. एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. तिच्या अध्यक्षपदी ते स्वतःच होते. त्यावेळी त्यांचे वय ८४ वर्षे होते. बैठकीचे अध्यक्ष खुर्चीवर ताठ बसलेले आणि उपस्थित मुख्यमंत्री सोफ्यावर बसलेले होते. मात्र पंतप्रधान ताठ बसलेले असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सोफ्यात पाठ टेकून बसता येईना. परिणामी बैठक झाल्यानंतर सर्वांना सुटकेचा निःश्‍वास टाकला आणि दोघा मुख्यमंत्र्यांना सरळ दवाखान्यात जावे लागले. पंतप्रधान मोरारजी मात्र ताठपणे उठले आणि भरभर चालत दुसर्‍या बैठकीला गेले. तिथे ताठ बसून त्यांनी दुसरीही बैठक घेतली.