श्रीदेवी, जयाप्रदा आणि माधुरी


दक्षिण भारताने हिंदी चित्रपटांचा दुस्वास केला खरा पण याच दक्षिणेने या बॉलीवूडला तीन चार समर्थ नट्या दिल्या. वैजयंतीमाला, वहिदा रहेमान, हेमा मालिनी, जया प्रदा आणि श्रीदेवी अशी ही नामावली आहे. श्रीदेवीने लेडी सुपर स्टार हा मान मिळवला. एक वेळ तर अशी होती की, श्रीदेवीला फिमेल बच्चन म्हटले जात होते. तिला यासाठी जया प्रदाशी सामना करावा लागला पण तिच्या कारकिर्दीच्या शेवटच्या पर्वात माधुरी दीक्षितने तिची जागा घेण्यात यश मिळवले. श्रीदेवीची कारकीर्द मोठी होती पण जया प्रदा आणि माधुरी दीक्षित यांच्या कारकिर्दी काही फार कमी नव्हत्या. जया प्रदा आणि श्रीदेवी या एकाच वेळी हिंदीत आल्या. दोघींनी नऊ चित्रपटात सोबत काम केले. दोघीही नावाजलेल्या निष्णात नृत्यांगना. जया प्रदा काही वेळा श्रीदेवी पेक्षा वरचढ ठरत असे.

या चित्रपटसृष्टीत रूपाला फार महत्त्व असते. या बाबीतही जया प्रदा श्रीदेवीपेक्षा प्रभावी दिसत असे पण उंची आणि अभिनय या दोन गोष्टीत श्रीदेवीने जया प्रदाला मागे टाकले. दोघींनी तोहफा मध्ये जिंतेन्द्र सोबत काम करताना आपल्या अभिनयाची झलक दाखवली. सरगम नेही जया प्रदाची क्रेझ वाढवलीच. शराबी, संजोग हेही तिचे चित्रपट हिट झाले. पण श्रीदेवीच्या चांदणी आणि मिस्टर इंडिया या दोन चित्रपटांनी तिला अशा उंचीवर नेऊन ठेवले की जया प्रदाची कारकीर्द झाकोळून गेली. १९८० चे दशक आणि ९० च्या दशकाचा पूर्वार्ध हा काळ श्रीदेवीचा होता आणि तिच्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नव्हते.

१९९० च्या प्रारंभी धक धक गर्ल म्हणून या विश्‍वात पदार्पण केलेल्या माधुरी दीक्षित हिने मात्र श्रीदेवीच्या ग्लॅमरला धक्का दिला. १९८४ सालच्या अबोध मधून माधुरीने पदार्पण केले पण १९८८ च्या तेजाब मधील एक दो तीन ने ती प्रेक्षकांच्या हृदयात जाऊन बसली. एनर्जी, रूप, नृत्य, अभिनय आणि फोटोजेनिक चेहरा यांच्या जोरावर तिने लाखो प्रेक्षकांना घायाळ केले. सुपर स्टार श्रीदेवीला खरे आव्हान माधुरी दीक्षितनेच दिले. अनिल कपूर, सनी देओल, जॅकी श्राफ, गोविंदा, शाहरूख खान, संजय दत्त अशा सगळ्या आघाडीच्या हिरोंसोबत काम करून माधुरी आपले स्थान पक्के करीत होती तर श्रीदेवीला आपले हीरोज ऋषी कपूर आणि अनिल कपूर यांच्यापर्यंत मर्यादित झालेले पहावे लागत होते. श्रीदेवीचा रूप की रानी चोरोंका राजा हा चित्रपट आपटला आणि श्रीदेवी पुन्हा उठलीच नाही. उलट माधुरी दीक्षितने आपला प्रभाव वाढवला. हम आप के है कौन ने माधुरी शिखरावर पोचली आणि श्रीदेवीची सद्दी संपली.

Leave a Comment