नीरव मोदीचा पीएनबी घोटाळा आता १२६०० कोटींच्या घरात


नवी दिल्ली – हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदीचा १३२२ कोटींचा आणखी एक घोटाळा पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) उघडकीस आणला असून नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी २०४ मिलियन डॉलर म्हणजे १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला दिली. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीचा हा घोटाळा या नव्या घोटाळ्यामुळे १२६०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.

पीएनबीने यापूर्वी नीरव मोदीवर ११४०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पीएनबीच्या वर्ष २०१७ च्या एकूण फायद्याएवढे नीरव मोदीने केलेल्या या अवैध व्यवहाराचे मूल्य आहे. सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पीएनबीला वर्ष २०१७मध्ये १३२० कोटी रूपयांचा फायदा झाला होता. बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला.

२०४ मिलियन डॉलर म्हणजेच १२६०० कोटी रूपयांपर्यंत नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा पोहोचला आहे, असे पीएनबीने आपल्या फायलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले. अन्य एका फायलिंगमध्ये पीएनबीने या घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केल्याचे फेटाळले आहे.

Leave a Comment