चर्चा तर होणारच पण…..


प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या व्यक्तींच्या जीवनातील लहान सहान गोष्टीही चर्चेचा विषय होत असतात. त्यातल्या त्यात सिनेमा नटींच्या बाबतीत तर खासच घडते. मग त्याला श्रीदेवी कसा अपवाद असेल ? ती तर सिनेसष्टीतली लेडी सुपर स्टार होती. एकतर तिच्याविषयी सिनेरसिकांत आकर्षण होते आणि त्यातच ती वयाच्या केवळ ५४ व्या वर्षी मरण पावली. हे काही मरणाचे वय नाही. त्यातल्या त्यात हृदयविकाराने मरण्याचे वय नाही. शिवाय ती परदेशात जाऊन मरण पावली. या सगळ्या गोष्टी आगळ्या वेगळ्या घडल्या. काही लोकांना सारे काही सुरळीत असतानाही कंड्या पिकवण्याची सवय असते. मग अशा वेगळ्या प्रकारात कंड्यांना ऊत आला नसता तरच नवल होते. आता श्रीदेवीच्या मृत्यूच्या कारणावरून जो तो आपापल्या परीने विश्‍लेषण करायला लागला आहे.

श्रीदेवीने आपले सौंदर्य टिकवून धरण्यासाठी सातत्याने वैद्यकीय उपचार सुरू ठेवले होते. आपले सौंदर्य हेच आपले भांडवल आहे याची जाणीव अशा कलाकारांच्या मनात तीव्रतेने वास करीत असते. आता आता तसे उपचारही निघाले आहेत आणि ते भारतातही उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे असे उपचार करून घेण्याचा मोह श्रीदेवीलाही टाळता आला नसेल तर त्यात नवल नाही. पण श्रीदेवीच्या बाबतीत त्यांचाही अतिरेक झाला. आता मिळालेल्या माहितीवरून तिने गेल्या काही वर्षात २९ प्रकारच्या लहान मोठ्या शस्त्रक्रिया करून घेतल्या होत्या. त्या शस्त्रक्रियांमुळेच तिला ह्दयविकाराचा झटका आला असा काही लोकांना कयास आहे.

खरे तर तिचा मृत्यू नेमका कसा झाला हा डॉक्टरांच्या तपासणीचा विषय आहे आणि त्यावर डॉक्टरच प्रकाश टाकू शकतील. अजून एकाही डॉक्टरांनी याबाबत कसला खुलासा केलेेला नाही पण समाजातले काही अर्धे कच्चे स्वघोषित डॉक्टर आपापले तर्क जाहीर करायला लागले आहेत. तिच्या मृत्यूला अजून ४८ तासही झालेले नाहीत आणि तिचे अंत्यविधीही झालेेले नाहीत. त्याच्या आतच अशी चर्चा व्हावी ही बाबही दु:खाची आहे. मुळात श्रीदेवी ही हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतली एक सभ्य नटी होती. तिच्या बाबत कधीही कसलाही वाद निर्माण झालेला नाही. ती सुस्वभावी असल्याने या चंदेरी दुनियेतल्या बहुसंख्य आणि त्यातल्या त्यात तिच्या संपर्कात आलेल्या कलाकारांना तिच्याविषयी अमाप आदर आहे. त्यांच्यात या वादावरून नाराजी निर्माण झालेली आहे.

Leave a Comment