केस कलर करताना घ्या या गोष्टींची काळजी


आजकाल केसांसाठी निरनिराळ्या उत्तमोत्तम ब्रँड्स चे, अनेक शेड्स चे कलर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे केस कलर करणे हे केवळ पांढऱ्या केसांना लपविण्यापुरते मर्यादित राहिले नाही. आताची पिढी फॅशन ट्रेंड म्हणून केस हौशीने कलर करून घेत असते. पण केसांसाठी कलर निवडताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. केसांना कलर करण्याआधी आपल्याला नक्की कोणत्या प्रकारे कलर करायचे आहे हे ठरवावे. ब्लॉन्ड, अॅश ब्लॉन्ड अश्या प्रकारच्या शेड्स हव्या आहेत की आधी होते त्यापेक्षा हलक्या किंवा गडद शेड चे केस तुम्हाला कलर करायचे आहेत हे ठरवून मग त्याप्रमाणे शेड निवडावी.

आपल्या केसांसाठी कोणत्या प्रकारचा कलर चांगला दिसेल याबद्दल आपल्या हेअर स्टायलिस्टशी चर्चा करावी. तुम्हाला केसांसाठी जी शेड आवडली आहे, ती तुमच्या त्वचेच्या वर्णाला शोभून दिसेल किंवा नाही, याबद्दलही विचार करणे अगत्याचे आहे. त्याचबरोबर केसांचे टेक्श्चर कसे आहे यावरीही केसांचा कलर अवलंबून असतो. तसेच, कालांतराने केसांचा कलर हलका झाला की तो कसा दिसेल याचाही विचार कलर निवडताना करायला हवा.

जर केसांसाठी तुम्ही ड्राय शँपू करीत असाल, तर ज्या दिवशी केसांना कलर करणार असाल, त्याच्या एक दिवस आधी ड्राय शँपू वापरण्याऐवजी एखाद्या सौम्य शँपूने केस धुवावेत. जर केस कलर करण्याआधी ड्राय शँपू वापरला, तर त्याची केसांवर एक लेअर तयार होते आणि मग केसांवर कलर योग्य प्रकारे होऊ शकणार नाही. हेअर कलर केल्यानंतर स्टायलिंग साठी अल्कोहोल बेस्ड स्प्रेचा वापर माफक प्रमाणात करावा. जर कलर केलेल्या केसांवर जास्त स्प्रेचा वापर केला तर केसांची चमक निघून जाऊन केस रुक्ष, राठ दिसू लागतात.

केस कलर करून घेण्याआधी हेअर कलरच्या, आपल्या आवडत्या शेड चा फोटो सॅलोनमध्ये बरोबर घेऊन जाण्यास विसरू नये. असे केल्याने तुम्हाला तुमच्या केसांसाठी नक्की कोणत्या प्रकारची शेड हवी आहे, हे तुमच्या स्टायलिस्टला चांगल्या प्रकारे कळू शकेल.

Leave a Comment