आरोग्यासंबंधी काही तथ्ये


आपल्याकडे चांगल्या आरोग्याचे काही ठराविक ठोकताळे मानले गेले आहेत. आपण हे ठोकताळे लक्षात घेता समोरची व्यक्ती निरोगी आहे किंवा नाही याचे अंदाज आपण बांधत असतो. पण खरे तर हे ठोकताळे किंवा या मान्यतांमध्ये खरोखरच कितपत तथ्य आहे, ह्या बद्दल विचार केला जाणे अगत्याचे आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी ज्या मान्यता तुम्ही गृहीत धरून चालता, त्या बरोबर आहेत किंवा नाही, याचा विचार व्हायला हवा.

आपल्या परिचयाची काहीशी स्थूल व्यक्ती, घरामध्ये एखादे लग्नकार्य आहे, किंवा इतर कुठला समारंभ आहे, आणि त्यामध्ये आपण सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असायला हवे या विचाराने कडक पथ्ये आणि व्यायामाचा अतिरेक करून थोड्याश्या वेळामध्ये भरपूर वजन कमी करण्याच्या मागे असते. त्यांच्या इच्छेप्रमाणे वजन घटते देखील, पण ज्या कारणाकरिता वजन कमी केले आहे, ते संपल्यानंतर शारीरिक स्थिती पूर्वपदावर येते. याला ‘ यो यो डायटिंग ‘ असे नाव दिले गेले आहे. डायट आणि व्यायाम यांच्या मदतीने वजन घटविणे योग्य असले, तरी हा उपाय पर्यायी नसून कायमस्वरूपी असावा. आपले वजन, आपल्या शरीराची ठेवण आणि उंची यांना अनुसरून असयला हवे. त्यामुळे काही कारणाने वजन घटविणे आणि मग ते पुन्हा बेलगाम वाढू देणे, याचे दुष्परिणाम कालांतराने समोर येतात.

आणखी एक गैरसमज अगदी सर्रास पाहायला मिळतो, तो हा, की सडपातळ असणाऱ्या व्यक्ती निरोगी असतात. ह्या मान्यतेमध्ये कोणते ही तथ्य नाही. शरीराचे आकारमान पाहून ती व्यक्ती निरोगी आहे अथवा नाही याचा अंदाज बांधता येत नाही. उदाहरणार्थ, मधुमेह हा रोग स्थूल व्यक्तींना उद्भविण्याची शक्यता जास्त असते हे जरी खरे असले, तरी मधुमेह हा विकार मानसिक तणाव आणि अनुवांशिकता ह्या दोन्ही गोष्टींमुळे देखील उद्भवतो, त्यामुळे सडपातळ व्यक्तींना देखील या विकारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

महिलांच्या बाबतीत कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे, ही मान्यता चुकीची आहे. भारतामध्ये महिलांच्या बाबतीत सर्वाधिक मृत्यू होण्याचे कारण कर्करोग नसून हृदयरोग आहे. चाळीस वर्षांपेक्षा कमी वयामध्ये हृदयरोगामुळे मृत्यू पावणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. याचे मुख्य कारण हे, की एकतर हृदयाशी निगडीत काही व्याधी आहे, हे लक्षातच येत नाही, आणि निदान झाले, तरी महिला त्याबाबतीत काहीश्या निष्काळजीपणा करीत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. धूम्रपान, अनियमित खानपान, गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन, अत्याधिक मानसिक तणाव या कारणांमुळे महिलानामध्ये हृदयरोगाचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. त्याचप्रमाणे हृदयरोगाचा प्रभाव महिलांच्या आणि पुरुषांच्या बाबतीत वेगवेगळा असू शकतो हे लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment