काल भारतीय हवाई दलात अवनी चतुर्वेदी या तरुणीने हवाई दलातले मिग २१ हे लढावू विमान चालवणारी पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला. तिने हे विमान पहिल्यांदा तर चालवलेच पण सोबत कोणी नसतानाही एकटीने ते चालवले. हवाई दलात लढावू विमान चालवण्यासाठी या आधीच तीन महिला पायलटांची निवड करण्यात आली होती. अवनी चतुर्वेदी सोबतच भावना कांत आणि मोहना सिंग या दोघींचा समावेेश त्यात होता. त्यातल्या अवनीला प्रत्यक्षात ही संधी मिळाली. ती देण्यापूर्वी या तिघींचे फार कठिण असे प्रशिक्षण करण्यात आले आहे. या तिघी जुलै २०१६ मध्ये हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवडल्या गेल्या होत्या.
महिला पायलटांचा जमाना
अवनीच्या उड्डाणानंतर हवाई दलाने आणखी तिघींना मिग लढावू विमानांचे चालक म्हणून निवडले असून त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. नवी माहिती अशी की, भारत या बाबत आघाडीवर आहे. १९९१ साली भारतात महिला पायलटांची निवड होण्यास सुरूवात झाली आणि आता भारतात हवाई वाहतूक अन्य प्रगत देेशांच्या तुलनेत कमी असूनही महिला पायलटांची संख्या भारतात सर्वात अधिक आहे. अन्य अनेक प्रकारची विमाने महिलांनी चालवली असली तरी त्यांनी आजवर लढावू विमाने कधी चालवली नव्हती. ते पर्व आता अवनीच्या या विमान चालनाने सुरू झाले आहे. लष्करात केवळ हवाई दलातच नाही तर नौदलात ही महिला पायलट असतात. तेव्हा नौदलातली पहिली महिला पायलट होण्याचा मान शुभांगी स्वरूप या तरुणीने मिळवला आहे. ती उ. प्र. तील बरेली येथील राहणारी आहे.
भारतातील महिला पायलटांचा पहिला विक्रम लवकरच होणार आहे. या विक्रमात कर्नाटकातली ऑड्री दीपिका मेबन ही गुंतली असून तिने ८० दिवसांत ५० हजार किलो मीटर अंतर विमान चालवण्याचा विक्रम करण्याचा निर्धार केला आहे. ती या कामात अन्य कोणाची मदत घेणार नाही पण तिच्या सोबत तिची पायलट मुलगी एमी मेहता हीही असणार आहे. तिचे वय केवळ १९ वर्षे आहे. माही या विमानातून हे मायलेक बंगलूरूच्या जक्कूर विमानतळा पासून हा प्रवास सुरू करतील. अनेक देशांचा दौरा करून त्या आपल्या विमानासह याच विमानतळावर परत येतील. त्या या प्रवासात ५४ ठिकाणी लँडिंग करतील. त्यांना या प्रवासातून आणि विक्रमातून महिला सबलीकरणाचा संदेश सार्या जगाला द्यायचा आहे. त्यांच्या प्रवासातून जपान, अमेरिका, रशिया या देशांना भेटी देतील.