माणूस सापाला चावतो तेव्हा……..


कुत्री तर माणसाला चावतच असतात पण माणूस कधी कुत्र्याला चावत नाही. म्हणून कुत्रा माणसाला चावला ही सामान्य घटना ठरते तर माणूस कुत्र्याला चावला तर ती सामान्य घटना न ठरता ‘बातमी’ ठरते. म्हणून पत्रकारितेत बातमीची व्याख्या समजवताना हेच उदाहरण दिले जाते. आता हे उदाहरण जुने झाले आहे आणि पत्रकारितेला एक नवे उदाहरण मिळाले आहे कारण या उदाहरणातील घटनेत माणूस कुत्र्याला नाही तर सापाला चावला आहे. खरे तर साप माणसाला चावला हीच मुळात बातमी ठरते कारण सापाने चावणे हे काही कुत्र्याने चावल्यासारखे मामुली नसते. सापाचे चावणे हे जीवघेणे ठरू शकते. तेव्हा साप माणसाला चावला हीच मुळात बातमी ठरते तिथे माणूस सापाला चावला तर केवळ बातमी नाही तर सनसनाटी बातमी ठरते.

उत्तर प्रदेशात हरदोइर्र जिल्ह्यात ही घटना घडली. सोनेलाल नावाच्या एका गुराख्याने हा पराक्रम केला आहे. तो सापाला चावला पण हा चावा काही सामान्य नव्हता. सोनेलालने सापाचे मुंडके आणि जिथे त्याचे विष असते तो भाग चावून टाकला होता. साप तसा काही माणसाला उपद्रव देत नसतो. मात्र माणूस हा त्याला आपला शत्रू मानतो आणि साप दिसला की त्याला ठेचून मारण्याचा प्रयत्न करतो. एकट्याला हे शक्य नसेल तर अनेकजण मिळून सापाला ठेचून मारतात. पण असा प्रयत्न असफल ठरला आणि साप अर्धवट जखमी अवस्थेत पसार झाला तर तो त्याला मारण्याचा प्रयत्न करणारावर डुख धरतो आणि त्याला भेटेल तिथे चावून मारून टाकतो.

सोनेलालच्या प्रकारात नेमके उलटे घडले आहे. सापाने त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्पदंशातून तो बचावला आणि त्याने सापाप्रमाणेच त्याचा डुख धरून त्याला मारून टाकले. अशा रितीने सापाचा बदला घेतला पण त्यातही विचित्रपणा केला. साप हा माणसाला चावा घेऊन मारत असतो तसेच सोनेलालने सापाला चावा घेऊन मारून टाकले. अर्थात त्याला हा बदला घेणे फार महाग पडले. त्याने सापाचा बदला घेताना त्याच्या तोंडाचा चावा घेतला. त्यामुळे सापाचे विष सोनेलालच्या शरीरात भिनले आणि तो बेशुद्ध पडला. त्याला त्याच अवस्थेत दवाखान्यात आणण्यात आले. त्याच्या शरीरावर कोठेही सर्पदंशाची खुण सापडली नाही म्हणून त्याला आठ तास निगराणीखाली ठेवण्यात आले. त्या वेळेत तो शुद्धीवर आला. तेव्हा त्याने सारी हकिकत सांगितली. साप आपल्याला चावला नव्हता तर चावणार होता. म्हणून आपण त्याला चावा घेऊन मारून टाकले असे तो म्हणाला. चावल्यानंतर आता आपल्याला विष चढणार या कल्पनेने तो बेशुद्ध झाला होता.

Leave a Comment