वजन घटविण्यासाठी खाण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे


वजन घटविण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण आहार किती असावा व कसा असावा, या बरोबरच तो घेताना कसा खाल्ला जावा, खाताना कश्या प्रकारे अन्न खाल्ले जावे या गोष्टीचा ही वजन घटविण्यासाठी विचार केला जाणे आवश्यक आहे. अनके व्यक्तींना खूप घाईघाईने जेवण संपविण्याची सवय असते. कामाचा ताण आणि वेळेची कमतरता हे यामागील मुख्य कारण असू शकते. पण काही व्यक्ती कामाचा कोणत्याही प्रकारचा ताण आणि वेळेची कमतरता नसताना देखील अतिशय भरभर जेवताना पाहायला मिळतात. या पद्धतीने जेवल्यामुळे वजन कमी होण्यात अडचणी निर्माण होतात.

अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधानुसार, सावकाश जेवणे, एकदा जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीही न खाणे, आणि रात्री झोपण्याच्या वेळेआधी कमीत कमी तीन तास आधी शेवटचे भोजन झालेले असणे, या तीन गोष्टी वजन कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. योग्य आहाराबरोबर या सवयी देखील आत्मसात केल्या तर वजन आणि बॉडी मास इंडेक्स कमी होण्यास मदत होते.

ह्या शोधनिबंधातील निदाने, जपानमधील मधुमेहाने ग्रस्त असलेल्या ६०,००० लोकांच्या आहाराबाद्द्लाच्या सवयींचे अवलोकन करून केली गेली आहेत. ह्या लोकांना, त्यांच्या नियमित हेल्थ चेक अप्स च्या दरम्यान, त्यांची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल प्रश्न विचारले गेले. तसेच जेवत असताना किती वेगाने जेवतात यावरीही विशेष ध्यान दिले गेले. सावकाश जेवणे, एकदा भोजन झाल्यानंतर पुनश्च काहीही न खाणे, रात्री झोपण्याच्या किमान तीन तास आधी काहीही न खाणे, आणि सकाळचा नाश्ता अजिबात न घेणे, या सवयींपैकी कोणत्या सवयींचे, हे रुग्ण नियमित पालन करतात, याचे ही अवलोकन करण्यात आले. या सर्वेक्षणामध्ये २२,००० लोक भरभर जेवतात असे दिसून आले, ३३,००० लोक सामान्य वेगाने जेवतात, तर केवळ ४१०० लोक अतिशय सावकाश जेवत असल्याचे आढळून आले.

ज्या व्यक्ती भरभर जेवतात, त्यांच्यापेक्षा सामन्य वेगाने जेवणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा २९ टक्के कमी आढळला, तर अतिशय सावकाश जेवणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा ४२ टक्क्यांनी कमी आढळला. सावकाश आणि सामान्य वेगाने जेवणाऱ्या व्यक्तींच्या कंबरेचा घेर ही कमी आढळला. भरभर जेवण्याच्या सवयीने शरीरामध्ये इन्स्युलीन रेझिस्टन्स आढळून येत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. तसेच भरभर जेवणाऱ्या व्यक्तींची भूक लवकर शमत नाही. त्याउलट सावकाश जेवणाऱ्या व्यक्तींचे पोट लवकर भरल्याने त्यांच्या आहाराची मात्रा आपोआपच नियंत्रित राहते.

भोजन झाल्यानंतर पुनश्च काही खाणे किंवा रात्री झोपण्याआधी पर्यंत खात राहणे या सवयी देखील वजन वाढत राहण्यास कारणीभूत आहेत, त्यामुळे ज्यांना वजन घटवायचे असेल, त्यांनी या सवयींवर नियंत्रण ठेवायला हवे. तसेच सकाळचा नाश्ता कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment