पॉलीसिस्टीक ओव्हेरियन डिसीज बद्दल थोडेसे…


पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा ओव्हेरियन सिस्ट सिंड्रोम हा महिलांमध्ये आढळणारा, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे उद्भविणारा विकार आहे. यामध्ये शरीरामध्ये हार्मोन्सचे असंतुलन निर्माण झाल्यास ओव्हरीज मध्ये अनेक लहान मोठे सिस्ट तयार होतात. फ्लुइडने भरलेल्या या लहान पिशव्यांना सिस्ट म्हटले जाते. ओव्हरिज मध्ये ही सिस्ट तयार झाल्याने लठ्ठपणा, अंगावर, विशेषतः चेहऱ्यावर खूप केस येऊ लागणे आणि क्वचित महिलांच्या बाबतीत गर्भधारणा न होऊ शकणे अश्या प्रकारच्या तक्रारी उद्भवितात. रक्ताची तपासणी आणि सोनोग्राफीच्या मदतीने या विकाराचे निदान करता येते.

हा विकार का उत्पन होतो या मागची कारणे जाणून घेणे अगत्याचे आहे. महिलांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन हा मेल हार्मोन थोड्या प्रमाणात तयार होत असतो. या हार्मोनची पातळी जर महिलेच्या शरीरामध्ये वाढली, तर मासिक धर्माशी निगडीत शारीरिक प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ओव्हरीजमध्ये सिस्ट तयार होऊ शकतात. तसेच, शरीरामध्ये प्रोलॅक्टीन आणि लूटायनिजिंग हार्मोन्सच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने देखील सिस्ट तयार होतात. शरीरामध्ये इन्स्युलीनची पातळी जास्त असल्यास किंवा महिला अतिशय लठ्ठ असल्यासही ओव्हरीजमध्ये सिस्ट निर्माण होण्याचा धोका संभवतो. अनेक वेळा आनुवंशिकता देखील सिस्ट होण्याला कारणीभूत असू शकते.

जर ओव्हरीजमध्ये सिस्ट निर्माण झाली, तर त्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, किंवा मुलींना मासिक पाळी खूप उशीरा सुरु होणे, अंगावर, विशेषतः चेहऱ्यावर खूप केस येऊ लागणे, सतत मुरुमे-पुटकुळ्या येणे, लठ्ठपणा अश्या तक्रारी उद्भवू लागतात. अश्या वेळी मासिक पाळी येण्यासाठी औषधे घेण्याची वेळ येते. हा विकार उद्भविल्यास आहारामधेही बदल करण्याची आवश्यकता असते. आहारामध्ये ताजी फळे, ताज्या हिरव्या भाज्या घेणे आवश्यक असते. तसेच दरोरज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते. आहारामध्ये ताक, शहाळ्याचे पाणी, भाज्यांचे सूप, बाजरी, नाचणी, ओट्स, अक्रोड, बदाम, कडधान्ये, या पदार्थांचा समावेश करावा. तसेच, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, कोल्डड्रिंक्स, गोड पदार्थ, सॅच्युरेटेड आणि हायड्रोजनेटेड फॅट्स चे सेवन टाळ्याला हवे. योग्य आहारनियमन आणि औषधोपचार यांच्या मदतीने हा विकार संपूर्णपणे बरा होऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment