कोण आहे नीरव मोदी


आपल्या हातून कोणाचे अकरा रुपये देणे राहून गेले तर आपल्याला चैन पडत नाही पण भारतात असा एक हीरा जन्मला आहे की ज्याने आपल्याच देशातल्या पंजाब नॅशनल बँकेला अकरा हजार कोटी रुपयांची टोपी घातली आहे. या माणसाला हिरा म्हणणेच योग्य ठरेल कारण तो हिर्‍याचा व्यापारी आणि डिझायनर आहे. एखादा माणूस गर्भ श्रीमंत असला की, तो तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आला आहे असे म्हटले जाते. पण हा अकरा हजार कोटीचा हिरा म्हणजे नीरव मोदी हा जन्माला येताना हातात हिरा घेऊन जन्माला आला आहे कारण त्याच्या मोदी घराण्याचा खानदानी धंदा हिरे विकणे हाच आहे. त्याच्या किमान तीन पिढ्या या व्यवसायात आहेत आणि तो भारतात या घराण्यात जन्माला आला असला तरीही जगाची हिर्‍यांची राजधानी म्हणवल्या जाणार्‍या बेल्जीयममध्ये लहानाचा मोठा झाला आहे. आता तो ४७ वर्षांचा आहे.

त्याच्या घरात सतत हिर्‍यांचीच चर्चा चालते आणि त्यांचा हा बिझनेस आहे हे खरे पण त्याची भारतातल्या आणि जगातल्या धनाढ्य लोकांत गणना व्हावी एवढा काही तो श्रीमंत नव्हता. मुळात त्याला हा व्यवसाय करायचाच नव्हता. त्याला संगीत दिग्दर्शक व्हायचे होते. तशी त्याने काही तयारीही केली होती पण वयाच्या १९ व्या वर्षी त्याला बळजबरीने डुलाचे डिझाईन करायला भाग पाडले गेले आणि ते डूल फार छान तयार झाल्याने त्याला या व्यवसायात पडावेच लागले. त्याच्या दोन नेकलेसनी हॉंगकॉंगच्या हिर्‍याच्या लिलावात करोडो रुपये मिळवले आणि त्याचे नाव या क्षेत्रात घेतले जायला लागले. २०१४ साली त्याचे नाव जगातल्या धनाढ्य लोकांच्या फोर्बसच्या यादीत आले आणि तेव्हा पासून अंमलबजावणी संचालनालया सह अन्य काही संस्थांनी त्याच्यावर नजर ठेवायला सुरूवात केली.

त्याने आपल्या उद्योगाची सुरूवात आपल्या मामाच्या गीतांजली ज्वेलर्स या फर्मचा भागीदार म्हणून केली असली तरी आता त्याने स्वत:च्या अनेक फर्म स्थापन केल्या आहेत. बँकांकडून गैरमार्गाने पैसा काढण्याचे शिक्षण त्याला मामाच्या गीतांजलीमध्येच मिळाले आहे आणि आता त्याचे मामा या गैरव्यवहारातले भागीदार आहेत. नीरव मोदीची लंडन, न्यूयॉर्क, मुंबई आणि दिल्लीत कंपन्या आणि कार्यालये आहेत. तो आता चौकशीच्या कचाट्यात सापडला आहे आणि त्याच्या कार्यालयावर छापे टाकून त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहेे. मात्र त्याला व्यक्तिश: चौकशीला पाचारण करण्यात आलेले नाही. दरम्यान तो पळून गेला असल्याची अफवा आहे. पण चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांनी तो पळून जाणार नाही आणि विजय माल्या होणार नाही अशी ग्वाही दिली आहे.

Leave a Comment