बॉडी मास इंडेक्सचा बडिवार कशाला ?


आपण वजन वाढल्याने शरीरावर ताण पडायला लागला किंवा दम लागायला सुरूवात झाली की डॉक्टरकडे जातो तेव्हा तपासण्यासाठी डॉक्टरांच्या केबीनबाहेर रांगेत बसलेलो असतो. आपला नंबर लागेपर्यंत डॉक्टरांचे सहकारी आपला इसीजी काढतात, ब्लड प्रेशर पाहतात आणि नंतर आपल्याला वजनाच्या काट्यावर उभे करून आपले वजन नोंदतात. वजन वाढणे हे अनारोग्याचे लक्षण आहेख़रे पण तेवढेच एक लक्षण नाही. आपले वजन आपली उंची आणि वयाला अनुसरून योग्य आहे की नाही हे पाहिले जाते. यानुसार एक गुणोत्तर काढले जाते. त्याला बॉडी मास इंडेक्स असे म्हटले जाते. हा आकडा जणू आपल्या ह्दयाच्या आरोग्याचा निदर्शक असतो. ज्यांचा हा इंडेक्स २५ पेक्षा जास्त असतो त्यांना लाल दिवा दाखवला जातो.

डॉक्टर सांगतात, वजन वाढत आहे. सावधान. सगळ्या लठ्ठ लोकांना सातत्याने कानी कपाळी ओरडून सांगितले जाते की वजन कमी करा. वजन कमी करा. पण आता कॅनडात काही प्रयोग करण्यात आले असून वाढत्या आणि वाढलेल्या वजनाने फार घाबरून जाण्याचे कारण नाही असे त्यातून निष्पन्न झाले आहे. वजन वाढले म्हणून ह्दयाला धोका पोहोचतो असे काही नाही. लठ्ठ माणसे ही हृदयविकाराची शिकार होतात पण तशी तर त्यामानाने कमी लठ्ठ असलेली आणि सडपातळ माणसेही हदयविकाराला बळी पडतातच ना ! मग केवळ तो लठ्ठ होता म्हणून त्याला ह्दयविकार जडला असे म्हणता येत नाही. पाहणी असे सांगते की, लठ्ठ माणसे ह्दयविकाराला बळी पडतात पण ती वाढलेल्या वजनामुळे नाही तर रक्तदाब, मधुमेह अशा जीवनशैलीशी निगडित विकारामुळे बळी पडतात.

ह्दयविकाराला बळी पडण्यात लठ्ठपणाचा नेमका वाटा किती यावर कॅनडातील डॉ. जेनिफर कुक आणि सीन व्हार्टन या दोघा संशोधकांनी काही प्रयोग केले. त्यांनी ८५३ लठ्ठ माणसांच्या ह्दयविकाराला बळी पडण्याच्या प्रवृत्तीची पाहणी केली. त्यासाठी त्यांचे तीन गट केले. एक गट अतीलठ्ठ लोकांचा, दुसरा मध्यम लठ्ठ लोकांचा आणि तिसरा गट केला कमी लठ्ठ लोकांचा. कमी लठ्ठ लोकांत ४१ टक्के लोक फिटनेसच्या बाबतीत कमी पडलेले दिसले. मध्यम लठ्ठ लोकांपैकी २५ टक्के लोकांचा फिटनेसचा प्रश्‍न होता पण अतीलठ्ठ लोकांपैकी केवळ ११ टक्के लोकच फिटनेसच्या बाबतीत कमी पडत होते. म्हणजे अतीलठ्ठ लोक फिट नसतात असे सरसकट विधान करता येणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment