वजन घटविण्याचा निश्चय असा टिकवून ठेवा


दर नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करायचेच असा निश्चय करतात. सुरुवातीला काही दिवस आहारावर नियंत्रण, योग्य व्यायाम, वेळेवर झोप, खाण्यापिण्याच्या वेळापत्रकाचे पालन, .. अश्या सगळ्या गोष्टी अगदी वेळच्यावेळी, काटेकोरपणे सांभाळल्या जातात. मात्र जसजसे दिवस उलटत जातात, तसतसे एकेक गोष्ट मागे पडत जाते, आणि अर्धे वर्ष सरायच्या आतच वजन कमी करण्याचा आपला निश्चय डळमळू लागतो. हा निश्चय आपल्याला टिकवून ठेवायचा असेल, तर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आपण करीत असलेला निश्चय खरोखरच साध्य करता येईल किंवा नाही याचा आधी विचार करावा. यालाच ‘ रियॅलिस्टिक डिसिजन मेकिंग ‘ असे म्हणतात. आपण मनाशी केलेला निश्चय जेव्हा असाध्य आहे हे लक्षात यायला लागते तेव्हा असे निश्चय अर्ध्यावरच सोडून दिले जातात. यामुळे आपले वजन आपण किती घटवणार आहेत याबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्या. जर दहा किलो वजन घटवायचे असेल, तर आधी तीन किलो वजन घटविण्यासाठी प्रयत्न करा आणि मग टप्प्या-टप्प्याने पुढे जा. तसेच वजन कमी करण्यासाठी योग्य कालमर्यादा ठरवा.

व्यायाम हा वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहे. जर एकट्याने व्यायाम करण्यास कंटाळा येत असेल तर व्यायामाची आवड असणारा ‘फिटनेस बडी’ किंवा सहकारी निवडा. एकमेकांसोबत व्यायाम करणे कंटाळवाणे होत नाही, आणि एकमेकांना प्रोत्साहन देत व्यायाम सुरु ठेवता येतो. त्याचप्रमाणे आपण दिवसभरात कधी, किती आणि काय काय खाल्ले हे लिहून ठेवण्याची सवय लावून घ्या. अश्याने तुम्ही तुमच्या खानपानाबद्दल आपोआपच जास्त जागरूक राहाल.

तुमचे, तुम्ही सडपातळ असतानाचे फोटो, तुम्हाला वजन कमी करण्यासाठी प्रेरणा ठरू शकतात. तसेच तुम्ही सडपातळ असतानाचे कपडे देखील तुमच्यासाठी प्रेरणास्रोत ठरू शकतात. वजन कमी करण्यासाठी निरनिराळ्या वर्कआऊट्स चा आपल्या दिनक्रमामध्ये समावेश करा. दररोज तोचतो व्यायाम कंटाळवाणा ठरू शकतो. त्याऐवजी निरनिरळ्या व्यायामप्रकारांचा अवलंब करा. कधी पळणे, कधी पोहोणे, कधी सायकलिंग, कधी ट्रेकिंग, कधी नुसतेच चालायला जाणे अश्या निरनिराळ्या व्यायामप्रकारांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. व्यायामासाठी जिममधेच जायला हवे असे नाही. तसेच आजकाल ऑनलाईन देखील व्यायामप्रकारांबद्दल मार्गदर्शन करणारे अनेक व्हिडीयोज, इतर माहिती उपलब्ध आहे, त्यांचा वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment