खास भारतीय पदार्थ कोणते ?


महाराष्ट्रात आता कांदा पोहे हा न्याहरीचा पदार्थ राहिलेला नाही तर मुलगी पहायला गेल्यावर मुलाला दिला जाणारा पदार्थ झाला आहे. सार्‍या भारताने हा पदार्थ आता स्वीकारला असून उत्तर आणि दक्षिण भारतात सर्वत्र तो आवडीने खाल्ला जात आहे. भारताच्या कोणत्याही शहरात गेलात की चौका चौकात सकाळचा ब्रेकफास्टचा पदार्थ म्हणून सर्व्ह करणारे गाडे दिसायला लागतात. आता हे पोहे भारतभर लोकप्रिय झाल्यामुळे हा पदार्थ नेमका आला कोठून याचेही विस्मरण व्हायला लागले आहे. तो महाराष्ट्राने भारताला दिला आहे हे विसरायला नको असेल तर त्याचे नाव मराठी पोहे असे ठेवले जावे अशी मागणी होणार आहे. पुरणाच्या पोळीचे नेमके असेच झाले आहे. महाराष्ट्रात ती एवढी लोकप्रिय आहे की ती मराठीच आहे असे वाटावे पण ती मुळात कर्नाटकातली आहे.

अनेकदा काही हॉटेलांत मराठी खाना म्हणून पाटी लिहिलेली असते पण आत जाऊन मराठी थाळीची ऑर्डर द्यावी तर पुरी भाजी आणि दहीवडा असलेली थाळी समोर येते. आता हे काही खास मराठी पदार्थ नाहीत पण खास मराठी खाना देणारी ही हॉटेले कोणातरी गैर मराठी माणसांनी काढलेली असतात आणि त्याला अस्सल मराठी पदार्थ कधी खाऊन माहीत नसतात. लोकांना आकृष्ट करण्यासाठी मराठी खाना असा फलक लावलेला असतो आणि आता बंगालमधून आणलेले कोणीतरी वस्ताद हे कथित मराठी पदार्थ करीत असतात. त्यांना ठेचा, पिठलं, मेथ्याचं वरण, भाकरी, हे काही माहीत नसतं. आजकाल अशा रितीने का होईना पण कोणतेही खाद्यपदार्थ आता केवळ एका राज्याचे राहिलेले नाहीत. ते जमेल तसे का होईना पण विविध राज्यात मिळतात आणि त्यामुळे ते नेमके मुळात कोणत्या राज्याचे आहेत याचे विस्मरण होते.

अशा काही अखिल भारतीय मान्यता मिळालेल्या आणि प्रांतियत्व विसरल्या गेलेल्या पदार्थांची यादी काही खानपान तज्ज्ञांनी केली आहे. तिच्यात पोह्याचा समावेश झाला आहे. साधारण ३० वर्षांपूर्वी दिल्लीत इडली सांबर मिळणे फार दुरापास्त होते पण आता इडलीसह सारे दाक्षिणात्य पदार्थ उत्तर भारतात सहजपणे मिळायला लागले आहेत. आता सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झालेले पकोडे हेही काश्मीर ते कन्याकुमारी मिळतात. बिर्याणी, कढी, खिचडी, यांनीही असेच राष्ट्रीय मान मिळवले आहेत. मुळात भारत खाद्यपदार्थांच्या विविधतेसाठी जगात प्रसिद्ध आहे. त्यातच आता अनेक पदार्थ सार्‍या भारतात मिळायला लागले आहेत.

Leave a Comment