मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करा हे उपाय


महिलांसाठी दर महिन्याला येणारी मासिक पाळी हा मोठा कठीण काळ असतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना ‘ बाहेर ‘ बसविण्याची पद्धत होती. यामुळे या कठीण दिवसांमध्ये स्त्रियांना आराम मिळत असे. पण आजच्या युगातील स्त्री सर्व आघाड्या सांभाळण्याची कसरत लीलया करीत असते. त्यामुळे महिन्याच्या ‘त्या’ दिवसांमध्ये आराम करण्यासाठी तिच्याकडे वेळच नाही. त्या दिवसांच्या दरम्यान होणारा त्रास, वेदना सर्व काही धीराने सहन करीत महिला आपल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असतात. मासिक पाळीच्या वेळी उद्भविणाऱ्या वेदना कमी करण्याकरिता काही महिला औषधे घेतात. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या वेदना कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करता येईल.

गरम पाण्याच्या पिशवीने पोटावर शेक घेतल्याने पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याच्या शेकामुळे गर्भाशयाचे आकुंचन पावलेले स्नायू शिथिल होण्यास मदत होते. त्यामुळे पोटदुखी कमी होते. या दिवसांमध्ये होणारी पोटदुखी कमी करण्याकरिता बाजारामध्ये अनेक तऱ्हेची हिटिंग पॅड्स उपलब्ध आहेत. तसेच कॅमोमाईल टी बनवून त्यामध्ये थोडे आले घालून हा चहा प्यावा. आल्यामध्ये वेदनाशामक गुण आहेत. याच्या सेवनामुळे शरीरातील प्रोस्टाग्लँडीनची पातळी कमी होते आणि वेदना कमी होतात. कॅमोमाईल टी मध्ये ही वेदनाशमन करण्याचे गुण आहेत.

बडीशेप प्रत्येक घरामध्ये सहज उपलब्ध असणारी गोष्ट आहे. पोटामध्ये पिळवटल्यासारख्या होत असणाऱ्या वेदना किंवा क्रँप्स कमी करण्यास याच्या सेवनाने मदत होते. त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये वदना होत असल्यास थोडी बडीशेप चावून खावी. थोडी बडीशेप पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्याने देखील आराम मिळतो. पाळीच्या दिवसांमध्ये पोट काहीसे फुगते आणि जड वाटू लागते. दालचिनीच्या सेवनाने हा जडपणा दूर होण्यास मदत होते. थोड्याशा गरम पाण्यामध्ये दालचिनीची पूड मिसळून हे पाणी प्यावे. असे दिवसातून दोन –तीन वेळा केल्यास पोटाचा जडपणा दूर होण्यास मदत मिळेल. या दिवसांमध्ये चहा कॉफीचे सेवन कमी करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment