पकोडे निवडणुकीचा विषय होणार


पकोडे तळून विकणे हा धंदा प्रतिष्ठेचा नाही असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते. किंबहुना तो धंदाच नाही तर भीक मागण्याइतकेच खालच्या पातळीचे काम आहे असे त्या सर्वांना वाटते. गंमतीचा भाग असा की, एकदा पी. चिदंबरम यांनी तसे म्हटले की, आता सगळे कॉंग्रेसवाले तसेच बोलत राहणार आहेत आणि मोदी यांच्या या संबंधातल्या म्हणण्याची शक्य तेवढी टर उडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.एवढेच नाही तर आपण या संबंधात जेवढे कल्पकतापूर्ण आंदोलन करू तेवढे आपण कॉंग्रेसश्रेष्ठींच्या मर्जीस पात्र ठरणार आहोत अशी खुणगाठ मनाशी बांधून असे कार्यक्रम करण्याची स्पर्धा या लोकांत लागणार आहे. मुंबईत संजय निरुपम यांनी असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.

दुसर्‍या बाजूला भाजपात आता पकोडेवाल्या उद्गारांचे समर्थन करण्याची होड लागली आहे. मोदी आणि अमित शहा यांचे या बाबतीतले म्हणणे कसे योग्य आहे हे पटवून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न भाजपाचे नेते करायला लागले आहेत. या सगळ्या प्रकाराचा नेमका लोकांवर काय परिणाम होणार आहे हे आताच सांगता येत नाही पण कॉंग्रेसचे नेते कष्टाच्या कामाला भीक मागण्यासारखे हलके काम समजतात असा संदेश जनतेपर्यंत जाण्याची शक्यता वाटायला लागली आहे. २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांची चायवाला म्हणून हेटाळणी केली होती. पण तिच्यातून घडले ते त्यांनाच महागात पडले. मोदींनी त्याचा फायदा करून घेतला. सामान्य माणसाला या प्रकाराने मोदीविषयी आपुलकीच वाटली आणि ते मोदींच्या पाठीशी उभे राहिले.

राजकारणात काही वेळा लोकांची मानसिकता ओळखून काम करावे लागते. आपण काय बोलत आहोत आणि त्याचा लोकांवर काय परिणाम होईल याचा अंदाज घेता आला पाहिजे. आपण कष्टाच्या कामाची अशी टिंगल टवाळी करायला लागलो तर ती कामे करणारे लोक आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे हे ओळखता आले पाहिजे. पण मुळातच कष्ट करणार्‍यांविषयी मनात हिणकस भावना असेल तर अशी बाष्कळ बडबड करण्याचीच प्रवृत्ती राहणार. मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणुकीत मोदींची निर्भत्सना करून असेच संकट ओढवून घेतले होते. आता चिदंबरम यांची पाळी होती. त्यांनी पकोडे तळणारांना वादात ओढले. आता हेच पकोडे त्यांना महागात पडण्याची संभावना आहे.

Leave a Comment