मोदींचे स्ट्रॅटेजिक भाषण


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहात केलेली भाषणे ही संसदेतल्या पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला शोभणारी नव्हती असा शेरा अनेक मान्यवर निरीक्षकांनी मारला आहे. ही भाषणे फार व्यापक प्रमाणावर ऐकली गेली आहेत आणि त्यांची चर्चा नंतरचे दोन दिवस जारी आहे. मान्यवरांनी मारलेला हा ताशेेरा खराच आहे कारण मोदींची ही भाषणे निवडणुकीच्या फडात द्यावीत अशी झालेली आहेत. खरे तर ही भाषणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शक चर्चेला उत्तर देणारी होती. अशा भाषणात पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या सूचनांना सकारात्मक उत्तरे दिली पाहिजेत पण मोदींनी ते न करता कॉंग्रेसला भरपूर धुऊन काढले. त्यांनी ते चुकून केलेले नाही तर ठरवून केले आहे.

काल मोदी सभागृहात आले तेव्हाच त्यांना परिस्थितीचा अंदाज आला होता. आपल्या भाषणात सतत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होणार हे त्यांना कळून चुकले होते. तेव्हा मोदींनी त्यांच्यावर ताण आवाजात पण किंचितही विचलित न होता आपले भाषण केले. त्यांनी काही युक्तिवाद तर एवढे तर्कशुद्ध होते की त्यांना उत्तर देणे राहुल गांधी यांना नंतरच्या ४८ तासातही शक्य झाले नाही. विशेषत: त्यांनी आपल्या सरकारवरील आरोपांना उपहास आणि विनोद या दोन हत्यारांचा वापर करून चोख उत्तर दिले. खासदार रेणुका चौधरी यांच्या विशिष्ट प्रकारच्या हसण्याला त्यांनी जे खमंग उत्तर दिले की, त्यांना त्याचा प्रॅतिवादही करता आला नाही.

हे भाषण करताना मोदींची नजर कर्नाटकाच्या निवडणुकीवर होते. म्हणून त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना निरुत्तर करताना बीदर ते कलबुर्गी या रेल्वे मार्गाचे काम कसे आपल्याच सरकारने केले आहे हे सप्रमाण दाखवून दिले आणि कर्नाटकाच्या मतदारांचे लक्ष वेधून घेतले. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिदरामय्या यांनी डावपेचाचा एक भाग म्हणून लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचा मुद्दा हवेत सोडून दिला आहे. लिंगायत हे भाजपाचे समर्थक आहेत. म्हणून भाजपाचे नेते या वादामुळे अस्वस्थ आहेत. मात्र मोदी यांनी खरगे यांची हजेरी घेताना, लिंगायत संप्रदायाचे संस्थापक महात्मा बसवेश्‍वर यांचा उल्लेख केला. खरगे यांनी देशातली लोकशाही नेहरूंमुळे आहे असे म्हणून गांधी घराण्याप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याची संधी साधली पण मोदींनी महात्मा बसवेश्‍वरांच्या धार्मिक संसदेचा उल्लेख करून खरगे यांना त्याचा विसर का पडला असा सवाल केला. ही मात्रा बरीच लागू पडणार आहे.

Leave a Comment