वजन घटविण्याचे उपाय आयुर्वेदाप्रमाणे…


लठ्ठपणा हा आजच्या काळातला सर्वात जास्त आढळणारा लाईफस्टाईल डिसीज म्हणावा लागेल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या सर्वेक्षणानुसार जगभरातील १.९ बिलियन लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लठ्ठपणाची मुख्य कारणे म्हणजे आपली वेगाने बदलती जीवनशैली, व्यायामाचा आभाव आणि आरोग्याशी निगडीत अन्य तक्रारी. लठ्ठपणामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होताच असतात, पण त्याचबरोबर लठ्ठ व्यक्ती आपल्या वाढत्या वजनमुळे आणि बेडौल दिसू लागलेल्या शरीरामुळे आपला आत्मविश्वासही गमावून बसते. लठ्ठ व्यक्तींच्या हालचालीमध्ये एक प्रकारची शिथिलता दिसून येते. लठ्ठपणा हा इतर ही अनेक व्याधींना आमंत्रण देणारा ठरतो.

आजकाल दररोज वजन घटविण्यासाठी तऱ्हे-तऱ्हेची औषधे, डायट, व्यायामपद्धती यांच्या बद्दल नित्य नवी माहिती आपल्या कानांवर पडत असते. पण यातील किती उपाय कामी येतील याबद्दल खात्री कोणीच देऊ शकत नाही. अश्यावेळी आपल्या परंपरेमध्ये फार जुन्या काळापासून चालत आलेल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या उपायांचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे वजन घटविण्यासाठी या उपायांचा अवलंब करून पाहावा. आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या उपचारपद्धतींचा अवलंब करून आजवर हजारो लोकांना आरोग्याचे वरदान लाभलेले आहे. भारतामध्ये आयुर्वेदिक उपचारपद्धती गेली पाच हजार वर्षे अस्तित्वात आहेत.

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही निश्चित नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये सर्व प्रथम आपण झोपेचे वेळापत्रक पाळणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांच्या झोपी जाण्याच्या आणि सकाळी उठण्याच्या वेळा निश्चित होत्या, त्यामध्ये क्वचितच काही कारणाने बदल होत असत. त्यामुळे त्या काळामध्ये आरोग्याशी निगडीत तक्रारी फारशा उद्भवत नसत. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, कामाच्न्ह्या ताणामुळे झोपेचे वेळापत्रक विस्कळीत झालेले पाहायला मिळते. अपुरी झोप किंवा झोपेच्या अनियमित वेळा, यामुळे वजन वाढत असल्याचे आयुर्वेदामध्ये म्हटले आहे. आयुर्वेदाप्रमाणे रात्री दहा ते सकाळी सहा ही वेळ झोपेसाठी उत्तम आहे.

सकाळी सहा वाजता उठल्यानंतर व्यायाम करणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळी हवा ताजी असते आणि शरीरही ताजेतवाने असते. त्यामुळे सकाळी व्यायाम केल्याने शरीरामध्ये दिवसभर उत्साह टिकून राहतो. त्यामुळे सकाळी किमान पाऊण तास व्यायाम करावा. तसेच दुपारचे जेवण हे आपल्या दिवसभरातील सर्वात मोठे भोजन असायला हवे. दुपारच्या वेळी जठराग्नी प्रदीप्त असतो, तसेच दिवसभराच्या हालचालीमुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत होते. तसेच रात्रीचे जेवण हे अगदी कमी असायला हवे. रात्री झोपण्याच्या वेळेमध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये किमान चार तासांचे अंतर असायला हवे.

आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे गरम पाणी हे अतिशय औषधी आहे. आपण खात असलेले प्रोसेस्ड अन्नपदार्थ, बाहेरील प्रदूषण, शारीरिक आणि मानसिक ताण यांच्यामुळे शरीरामध्ये टॉक्झिन्स साठत असतात. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील ही घातक द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते. तसेच दररोज मेडीटेशन ची सवय आत्मसात करावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment