निर्माल्याचाही व्यवसाय


सध्या भजे तळून विकणे हा व्यवसाय भीक मागण्याइतकाच खालचा असल्याचा शोध कॉंग्रेस पक्षाने लावला आहे. पण आपण आपल्या आसपास पहातो तेव्हा लहान सहान वाटणार्‍या अशाच व्यवसायातून अनेक लोक आपली उपजीविका साधताना दिसतात. आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा स्वरूपाचे धंदे असे लोक करीत असतात आणि त्यांचे कमायीही फार मोठी असते. अशा प्रकारच्या उपेक्षित व्यवसायात अनेकदा उच्चशिक्षित तरुणही उतरलेले आपल्याला आढळतात. मध्य प्रदेशातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या पदावर काम करणार्‍या दोन तरुणांना असे वाटले की आपल्या देशातल्या हॉटेलांत काही विशिष्ट प्रकारचीच चहाची पावडर वापरली जाते. प्रत्यक्षात चहाच्या पावडरुचेही शेकडो प्रकार असतात.

मग या दोघांनी याच व्यवसायात लक्ष घालायचे ठरवले आणि ते आता अनेक हॉटेलांना विविध प्रकारची पावडर विकत असतात. त्यातून त्यांना स्वत:ला तर हजारो रुपये कमावून देणारा व्यवसाय मिळालाच पण त्यांची चहाची पावडर खरेदी करणार्‍या हॉटेलांत चहा पिणारांची गर्दी वाढून त्यांचीही प्रगती झाली. कुत्री पाळणारे अनेक लोक आहेत. त्यांची ती हौस आहे पण रोज सकाळी कुत्र्यांना फिरायला न्यावे लागते. ती कटकट लोकांना नकोशी वाटत असते. म्हणून ते काम करणारी एक एजन्सी चेन्नईत एका तरुणाने सुरू केली असून तिच्यातून १०० लोकांना दररोज दोन तास काम करण्याची नोकरी दिली आहे.

महाराष्ट्रात दरसाल गणेशोत्सव झाला की, पर्यावरणवादी संघटना लोकांना गणपतीच्या मूर्ती पाण्यात विसर्जन न करता त्या आपल्याला द्याव्यात असे आवाहन करतात. या मूर्ती विरघळवून त्यापासून पुन्हा शाडू मिळवला जातो. पण याचा व्यवसाय करावा असा विचार कधी कोणी केलेला नाही. यावेळी निर्माल्याचेही दान करण्याचे आवाहन केले जाते. तसे ते आता केले जायला लागले आहे आणि त्यापासून कंपोष्ट खत तयार केला जात आहे. हा तर एक उपक्रम आहे पण निर्माल्य हे काही केवळ गणपतीतच असते असे नाही. ते वर्षभर मिळू शकते. तसा विचार करून कानपूरच्या दोघा तरुणांनी (त्यातला एक आय.टी. इंजिनियर) कायमचाच निर्माल्याचा वापर करून त्यापासून अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला असून त्यातून वर्षाला दोन कोटी रुपयांची कमायी करायला सुरूवात केली आहे. खरे तर निर्माल्य हे सार्‍या देशात सगळ्याच देवस्थानांच्या ठिकाणी मिळते मग सर्वच ठिकाणी असा व्यवसाय का केला जात नाही?

Leave a Comment