नवी दिल्ली : आजपासून सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवनाचे ह्रदय मानल्या जाणाऱ्या मुघल गार्डनची सफर खुली करण्यात आली असून तुम्ही मुघल गार्डनमधली रंगीबेरंगी फुले 9 मार्चपर्यंत सकाळी ९.३० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत डोळे भरुन पाहू शकाल.
परवाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उद्यानोत्सवाचे उद्घाटन केले होते. मुघल गार्डनची सफर पर्यटकांना पुढील जवळपास महिनाभर करता येईल. मुघल गार्डन फक्त २ मार्च रोजी होळीनिमित्त बंद ठेवण्यात येणार आहे. ९ मार्च रोजी शेतकरी, लष्करातील जवान, अंध-अपंगांसाठी मुघल गार्डनची सफर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, सूटकेस किंवा इतर साहित्य आत घेऊन जाण्यास मनाई आहे.
सर एडविन ल्युटियन्स यांनी राष्ट्रपती भवनात जम्मू काश्मीरातील मुघल गार्डनच्या धर्तीवर मुघल गार्डनची निर्मिती केली. तब्बल १५ एकरावर १९१७ साली तयार करण्यात आलेले मुघल गार्डन पसरलेले आहे. या गार्डनमध्ये भारतीय आणि पाश्चात्य देशांमधील फुलांची विशेष लागवड करण्यात आली आहे. गार्डनमध्ये १५९ जातीची विशेष फुले फुलवण्यात आली आहेत, तसेच ५० प्रकारची इतर झाडेही लावण्यात आली आहेत. ट्युलिप, लिली, डॅफोडिलसह इतर मोसमी फुलांचे ताटवे तुमच्या स्वागताला तयार असतात. म्युझिकल गार्डन, आयुर्वेदिक फुलांचे ताटवे, बोन्साय ही मुघल गार्डनची खास वैशिष्ट्य आहेत.