भारतातल्या महिला सासरी होणारा जाच हा इतका सहज मानतात की त्यांना या जाचाचे काही वाटत नाही. गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षात हे दिसून आले होते. काही सुशिक्षित आणि अशिक्षितही महिलांना नवर्याने मारण्याबाबत विचारले असता, त्यातल्या अनेक बायकांनी नवर्याने मारण्यात वेगळे ते काय असा प्रश्न विचारला. नवरा म्हटला की थोडी मारहाण करणारच असे उत्तर या महिलांनी दिले. महिलांचा हा दृष्टीकोन कौटुंबिक छळासंबंधीच्या एक पाहणीच्या निष्कर्षाशी सुसंगत असल्याचे दिसले आहे. २००४ ते २०१५ का अकरा वषार्र्त ही पाहणी करण्यात आली. तिच्यात असे आढळून आले की, दर दहा महिलांपैकी चार महिला घरातला जाच सहन करतात. मात्र त्यातल्या फार कमी महिला त्याबाबत तक्रार करतात. बहुतेक महिला जाच सहन करतात.
जाच सहन करण्याची प्रवृत्ती
बलात्काराच्या प्रकरणातही असेच आढळून आले होते. आपल्या समाजात अनेक महिलांवर बलात्कार होतात पण त्यातले फार कमी बलात्कार पोलिसांपर्यंत पोचतात. एकंदरीत आपल्या देशात महिलांची एक मानसिकता दिसून येते. बाईचा जन्मच असा जाचहाट सहन करण्यासाठी झाला आहे. तेव्हा त्याच्या वेदना सहन करीतच आपल्याला जगावे लागते. हे आपले नशीबच आहे असे त्यांना वाटते. एखाद्या महिलेने अशा जाचाला प्रतिकार करण्याचा विचार केला तरी तिला नेमके काय करता येणार आहे ? सासरचा छळ सहन न झाल्याने ती कोठे जाणार आहे ? तिला जायला दोन ठिकाणे असतात. एक ठिकाण म्हणजे आपले माहेर आणि दुसरे ठिकाण म्हणजे सरकारी आश्रम.
यातला माहेरचा आधार सगळ्याच महिलांना नसतो कारण माहेरचे लोक तिचा विवाह करून देऊन मोकळे झालेले असतात. मुलगी म्हणजे डोक्यावरचे ओझे अशी त्यांची कल्पना असते. तेव्हा तिचा विवाह लावून दिला की तिची आपल्यावरची जबाबदारी संपली. तिचे सासरी काय होणार आहे ते तिने बघावे. विवाहानंतर तिच्या संसारात हस्तक्षेप करायला ते तयार होत नाहीत. मुलीला विवाहानंतरही पाठींबा देणारे लोक फार कमी असतात. बहुसंख्य लोक तिला उसकी हाल पर सोडून देतात. समाजाचा तर फारच अल्प पाठींबा असतो. आपल्या देशात समाजातही अशीच धारणा असते की एकदा लग्न झाल्यास तिची जबाबदारी तिने सांभाळावी. अशी सगळीकडूनच असहायता दिसायला लागल्यावर छळ होणारी महिला तो सहन करण्याशिवाय काही पर्याय नाही या निष्कर्षाप्रत येते.