मार्चमध्ये चांद्रायण २


भारताची दुसरीत चंद्र मोहीम चांद्रायण २ ही पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. आपली पहिली चांद्रायण ही मोहीम अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली असून तिने चंद्राची काही अशी माहिती गोळा केली आहे की, जी अमेरिकेसारख्या चंद्रावर अनेक मोहिमा आखणार्‍या देशासाठीही नवी होती. तिच्या सोबत परदेशातलेही काही उपग्रह चंद्रावर पाठवण्यात आले होते. भारताच्या या यशामुळे आता सोडल्या जाणार्‍या दुसर्‍या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या मोहिमेत भारताचे चांद्रयान तिथे जाऊन परत आले होते पण आता हे दुसरे चांद्रायण तिथे काही साधनांना उतरवणार आहे. त्यासाठी दोन ठिकाणे निवडण्यात आली असून त्यातल्या दक्षिण ध्रुवावर हे साधन उतरविले जाण्याची शक्यता आहे.

चंद्राच्या या भागावर अद्याप अन्य कोणत्याही देशाचे यान उतरलेले नाही. भारताचेच यान तिथे प्रथम जात असल्याने या मोहिमेतून भारताच्या हाती बरीच आणखी नवी माहिती येण्याची शक्यता आहे. चांद्रायण २ च्या उड्डाणाची पूर्व तयारी तामिळनाडूतील महेन्द्रगिरी येथील द्रव इंधन संशोधन केन्द्रात सुरू आहे. चंद्रावर तळावर उतरण्यासाठी जरूर असलेले हार्डवेअर तयार झाले आहे. चांद्रायण २ हे यान अवकाशात सोडण्याचे काम मार्क २ या रॉकेटच्या साह्याने केले जाणार आहे. या रॉकेटात तीन साधने असतील त्यातल्या सहा चाकांच्या रोव्हरच्या मदतीने ते त्या विशिष्ट जागेच्या भोवती फेर्‍या मारू शकेल. या फेर्‍यात त्यात चंद्राच्या पृष्ठभागाची काही छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली जातील. त्यावरून चंद्राचा अधिक अभ्यास करता येईल.

यापूर्वीची चांद्रायण ही मोहीम २००८ साली पाठवण्यात आली होती. तिच्या मदतीने ज्या नोंदी करण्यात आल्या त्याच्या पुढच्या नोंदी घेण्याचे काम आता दुसरी मोहीम हाती घेणार आहे. चंद्रावर पाणी आहे का याचा शोध घेण्याचे चांद्रायण १ चे काम अर्धवट राहिले होते. ते आता पुढे चालू राहील. हे काम ज्या रोव्हरच्या मदतीने केले जाणार आहे तो रोव्हर केवळ २० किला वजनाचा असून त्याचे काम सौर ऊर्जेवर चालणार आहे. हे यान आणि त्यावरची साधने पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. चांद्रायण १ मध्ये केल्या गेलेल्या चुकाही या नव्या यानात दुरुस्त करण्यात आल्या आहेत. भारताची ही मोहीम देशाच्या अवकाश संशोधनातल्या वर्चस्वाचे दर्शन घडवणारे असेल असा विश्‍वास इस्रोचे निवृत्त प्रमुख किरण कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Leave a Comment