‘ताय-ची’ शिका आणि निरोगी राहा


‘ताय-ची’ हे एक प्रकारचे मार्शल आर्ट असून त्याची सुरुवात चीन मध्ये झाली. अनेक शतकांपासून हे मार्शल आर्ट चीनी लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असून, आता हे मार्शल आर्ट जगभरामध्ये लोकप्रिय होत आहे. या मार्शल आर्ट मध्ये मुख्य रूपाने शरीराच्या लहान लहान हालचालींवर लक्ष केंद्रित केले जाते. या मुळे शरीराची ताकद वाढण्याबरोबरच मानसिक एकाग्रता वाढण्यासही मदत मिळते. जेव्हा हे मार्शल आर्ट शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढविण्याकरिता आत्मसात केले जाते, तेव्हा याला ‘ ताय-ची ‘ असे म्हटले जाते, आणि जेव्हा ह्या मार्शल आर्ट चा उपयोग आत्मरक्षण करण्याकरिता केला जातो, तेव्हा याला ‘ ताय-ची च्युएन ‘ असे म्हटले जाते.

हे मार्शल आर्ट आत्मसात करणे फार अवघड नाही. कोणत्याही वयामध्ये, कुठलीही व्यक्ती की कला आत्मसात करू शकते. हे मार्शल आर्ट, मानसिक आणि शारीरिक हालचालींचे मिश्रण असून, यामुळे शरीराची ताकद वाढते आणि शरीर लवचिक बनते. त्याचबरोबर मानसिक एकाग्रता वाढण्यासही यामुळे मदत होते. या मार्शल आर्ट मध्ये कमी-अधिक वेगाच्या हातापायांच्या हालचाली केल्या जात असून, यामध्ये काही अवघड आणि काही सोप्या शारीरिक पोझिशन्सचा समावेश केलेला असतो. सतत केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शारीरिक हालचालींमुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन उत्तम रित्या साध्य केले जाते. त्याचबरोबर शरीरावर आणि मनावर उत्तम नियंत्रण आणि या दोहोंचा समन्वय साधणे देखील या मार्शल आर्ट मुळे शक्य होते.

ह्या मार्शल आर्टचा नियमितपणे सराव केल्याने शरीरातील सकारात्मक उर्जा वाढते. तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ह्या मार्शल आर्टचा सराव सुरु करण्यापूर्वी ह्यातील अनुभवी मार्गदर्शकांकडून, हे मार्शल आर्ट कशा प्रकारे केले जावे याचा सल्ला आणि थोडे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या मार्शल आर्ट करिता कोणत्याही व्यायामाच्या साधनांची आवश्यकता नाही. ह्याचा सराव गच्ची, बाल्कनी, किंवा पार्कसारख्या मोकळ्या जागेमध्ये करायला हवा. या ठिकाणी जाणे शक्य नसेल, तर घरामध्ये हवेशीर खोलीमध्ये या मार्शल आर्टचा सराव करावा.

या मार्शल आर्ट मुळे शरीरातील प्रत्येक लहान लहान स्नायूंवर ताण पडून, ते अधिक सक्रीय होण्यास मदत होते. या मार्शल आर्ट चा फायदा, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असतो, पण प्रत्येकाला यातून काही ना काही फायदा होतो इतके मात्र नक्की. वजन घटविण्यासाठी देखील हा व्यायामप्रकार एक चांगला पर्याय आहे. तसेच पाठीचे दुखणे असणाऱ्या व्यक्तींकरिता हा व्यायामप्रकार विशेष फायद्याचा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment