लातूरच्या विकासाला वेग


लातूर ते मीरज ही रेल्वे पूर्वी नॅरोगेज होती. तिच्या रुंदीकरणाची मागणी केली जात असे तेव्हा ती भारतातली सर्वाधिक लांबीची नॅरोगेज रेल्वे असल्याचे दिसून येत असे. अनेक वर्षे सातत्याने मागणी केल्यानंतर शेवटी तिचे रुंदीकरण झाले. मात्र या रुंदीकरणामुळे विकासाला गती मिळायला हवी होती. तशी ती काही अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही. तशी मिळतही नसते. मात्र या काळात लातूरचे नाव सार्‍या भारतात वेगळ्याच कारणावरून गाजले. तीव्र पाणी टंचाई असलेले गाव म्हणून. या गावाला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला त्यामुळे तर फारच चर्चा झाली. आता मात्र या गावाच्या विकासाला जोरदार चालना देणारी घोषणा झाली आहे. रेल्वेच्या डब्यांचा कारखाना तिथे होणार आहे. लातूरला होणार असलेल्या या कारखान्यात साधारणत: रेल्वेचे डबे तयार होणार आहेत पण त्यातल्या त्यात या प्रकल्पात मेट्रो रेल्वेचे डबे प्राधान्याने तयार होतील.

महाराष्ट्रात रेल्वेचे डबे तयार करण्याचा उद्योग कोठेही नाही. तामिळनाडूत एक आणि उत्तर प्रदेशात रायबरेली येथे असे एकेक कारखाने आहेत. १९८५ साली सोलापूर जिल्ह्यात असा एक कारखाना उभा करण्याची चर्चा सुरू झाली होती. तो कारखाना झालाही असता पण कोणी चाव्या फिरवल्या हे माहीत नाही पण सोलापूरला होऊ घातलेला हा कारखाना पंजाबात १९८६ साली कपूरथळा येथे झाला. सोलापूरला नंतर रेल्वेचे वर्कशॉप होणार असे जाहीर झाले होते. तो काही फार मोठा प्रकल्प नाही पण तरीही त्यावर १०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र तोही प्रकल्प आता मागे पडला आहे.

आता महाराष्ट्रात रेल्वेचा एक मोठा प्रकल्प लातूरला जाहीर झाला आहे. रेल्वेच्या डब्यांचा हा कारखाना १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून होणार आहे. एकदा हा प्रकल्प झाला की लातूरच्या परिसरात अनेक लहान सहान उद्योग होतील. औरंगाबाद हे शहर १९८० च्या दशकात तसे फार मोठे नव्हते पण बजाज कंपनीचा स्कूटरचा कारखाना तिथे निघाला, नंतर सिडको वसाहतीच्या निमित्ताने घरांची सोय झाली. रेल्वे ब्रॉडगेज झाली आणि या शहराचे रूप एक़दम बदलून गेले. तसाच प्रकार येत्या पाच ते दहा वर्षात लातूरच्या बाबतीत होईल अशी अपेक्षा आहे. मोदी सरकारने अनेक मोठ्या शहरांत मेट्रो रेल्वे टाकण्याचा आग्रह धरला असल्याने त्यांच्या डब्यांची मोठीच मागणी असणार आहे आणि त्यामुळे लातूरच्या कारखान्याला नेहमी मागणी राहणार आहे. या प्रकल्पासाठी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बरीच धडपड केली आहे.

Leave a Comment