भाजपाला धक्का


भारतीय जनता पार्टीचे नेते काल केन्द्रीय अंदाजपत्रक सादर करण्याच्या मन:स्थितीत असताना आणि या मार्गाने मतदारांना कसे राजी करता येईल याचा विचार करीत असतानाच राजस्थानातल्या तीन पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत होते आणि राजस्थानातले मतदार पक्षाला जोरदार धक्का देत होते. कारण याच वेळी राज्यातल्या तीन पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत होते आणि त्या तिन्ही पोटनिवडणुकांत भाजपाचे उमेदवार पराभूत होत असल्याचे जाहीर होत होते. यातल्या दोन जागा लोकसभेच्या होत्या आणि एक जागा विधानसभेची होती. विशेष म्हणजे या तिन्ही जागा भाजपाकडेच होत्या आणि त्या तिन्ही जागा आता भाजपाने गमावल्या आहेत. पोटनिवडणुकांच्या निकालाचे एक गणित असते. त्याचा विचार केला असता हे तीन पराभव भाजपाची नामुष्की करणारे आहेत.

या तीन जागा कॉंग्रेसने हिसकावून घेतल्या आहेत. गेल्या २०१३ साली राजस्थानात झालेल्या विधानसभा निवडणुकीत
भाजपाला देदिप्यमान विजय मिळाला होता आणि आता तितकीच मानहानीकारक हार पत्करावी लागली आहे. या तिन्ही जागा तिथल्या भाजपा सदस्यांच्या निधनाने रिकाम्या झाल्या होत्या आणि त्यामुळेच तिथे पोटनिवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. एखाद्या आमदार किंवा खासदाराच्या निधनामुळे पोटनिवडणूक होते तेव्हा त्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीची भावना व्यक्त होत असते. निधनाने होणार्‍या पोटनिवडणुकीत विद्यमान उमेदवाराच्या पक्षालाच विजय मिळत असतो पण या तिन्ही ठिकाणी सहानुभूतीच्या भावनेच्या विरोधात मतदान झाले आहे.

या निकालाने भाजपाच्या नीतीधैर्यावर परिणाम झाला असून आपल्याला एकही जागा का जिंकता येऊ नये यावर पक्षात आता विचार केला जायला लागला आहे. भाजपाला चांगले वातावरण असल्यामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडात भाजपाची सरकारे सलग तीन तीनदा निवडणूक जिंकत आहेत. पण राजस्थानात असा सलग विजय मिळवण्यात मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना यश येत नाही. कारण त्या म्हणाव्या तेवढ्या लोकप्रिय नाहीत आणि पक्षातही त्यांच्या विरोधात सतत एक लॉबी कार्यरत असते. त्यामुळे आता पक्षातून नेतृत्व बदलाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तशी मागणी झाली तरीही पक्ष नेतृत्व बदल करणार नाही कारण नाही म्हटले तरीही वसुंधरा राजे यांचा राजकीय पाया फार व्यापक आहे. त्यालाही नाराज करून चालणार नाही. पक्षाची गोची झाली आहे.

Leave a Comment