हेअर कलरमुळे केस खराब होणार नाहीत याची घ्या काळजी


आजकाल हेअर कलर लावणे केवळ पांढऱ्या केसांना लपविण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. आजच्या पिढीचे तरुण-तरुणी देखील अगदी हौशीने आपल्या केसांवर तऱ्हे-तऱ्हेच्या हेअर कलर्सचे प्रयोग करू बघणे पसंत करतात. कोणी सर्वच केस कलर करतात, तर कोणी केसांच्या काही बटा कलर करवितात, तर कोणी केवळ केसांच्या टोकांशी कलर लावणे पसंत करतात. केसांच्या मूळच्या काळ्या किंवा भुऱ्या रंगांच्या व्यतिरिक्तही निरनिराळ्या रंगांचे प्रयोग करून बघण्यास आजच्या पिढीला आवडते. अगदी जांभळ्या केसांपासून ते पोपटी रंगाच्या बटांपर्यंत सर्व तऱ्हेचे रंग आजची पिढी हौशीने आपल्या केसांमधून मिरवत असते. मात्र हेअर कलर वापरताना त्यातील रसायनांचे आपल्या केसांवर दुष्परिणाम होऊ शकतात. जर आपण आपल्या केसांची व्यवस्थित निगा राखली, तर हे दुष्परिणाम केसांचे नुकसान करू शकणार नाहीत.

केसांना हेअर कलर लावल्याने बहुतेकवेळा केस रुक्ष, राठ होतात. कारण या कलर्स मध्ये रसायनांचा वापर केलेला असतो. त्यामुळे केसांचे टेक्श्चर बदलून जाते. त्यामुळे आपल्या केसांना अधून मधून चांगल्या प्रतीच्या तेलाने मसाज करावे. केसांच्या मसाज करिता ऑलिव्ह ऑईल हा उत्तम पर्याय आहे. आठवड्यातून एकदा आपल्या केसांना हेअर मास्क्चे पोषण द्यावे. हा हेअर मास्क बनविण्याकरिता एका भांड्यामध्ये दोन अंडी, एक मोठा चमचा मध आणि थोडे खोबरेल तेल एकत्र करावे. यामध्ये एक केळे कुस्करून घालावे. केळे हे नैसर्गिक मॉईश्चरायझर आहे. त्याने केस मुलायम होण्यास मदत होईल. हा हेअर मास्क आपल्या केसांना वीस मिनिटे लावून ठेवावा, व त्यांनतर केस स्वच्छ धुवावेत.

आपण पहिल्यांदाच वापरत असलेल्या हेअर कलरची अॅलर्जी होण्याची देखील शक्यता असते. हेअर कलर वापरण्याचा हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो. जर आपण वापरलेला हेअर कलर आपल्याला ‘ सूट ‘ झाला नसेल, तर त्याची अॅलर्जी होते. डोक्यात सतत खाज सुटणे, स्काल्प लालसर दिसू लागणे, डोळ्यांभोवती सूज येणे, डोळ्यांच्या, नाकाच्या भोवतीची त्वचा सोलवटणे अशी अॅलर्जीची लक्षणे असू शकतात. अशी अॅलर्जी उद्भविली तर त्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबू ह्या दोन वस्तू अतिशय प्रभावी औषधे म्हणून वापरता येतील. यासाठी एक मोठा चमचा बेकिंग सोडा एक कप पाण्यामध्ये मिसळून हे पाणी केसांवर ओतावे. हे पाणी केसांमध्ये एक मिनिटभर राहू देऊन हलक्या हाताने केसांमध्ये मसाज करा. त्यानंतर केस पाण्याने धुवून टाका.

तसेच कलर केलेल्या केसांकरिता विशेष शँपू बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. आठवड्यातून किमान एकदा केसांना कोमट तेलाने मालिश करावी. तसेच केस धुतल्यानंतर केसांना कंडीशन करण्यास विसरू नये.

Leave a Comment