पोहायला जाताना..


आता थंडीचे दिवस सरून हवेमध्ये उष्मा जाणवू लागला आहे. पाहता पाहता हा मोसम सरेल आणि कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु होतील. उन्हाळा म्हटले, की पोहणे हा खूपशा मंडळींचा आवडता कार्यक्रम असतो. शहरांमध्ये राहणारे लोक बहुतेकवेळी स्विमिंग पुलस, किंवा सुट्टीवर गेल्यास तलाव, किंवा समुद्रामध्ये डुंबणे पसंत करतात, तर गावाकडे राहणाऱ्या लोकांना नदीमध्ये किंवा तलावामध्ये पोहोण्याची मजा लुटता येते. पण या आनंदाला गालबोट लागते, ते कोणी तरी पोहोताना आकस्मात बुडून मृत्यू पावल्याच्या बातमीने. अश्या बातम्या आपण वरचेवर टीव्हीवर पाहत असतो, वर्तमानपत्रांतून वाचत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये बुडून मृत्यू झालेल्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे आपल्या मित्रमंडळींसोबत पोहायला जाण्याचा कार्यक्रम ठरवत असताना काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे.

सगळ्याच नद्या किंवा तलाव, किंवा समुद्रकिनारे पोहोण्यासाठी सुरक्षित असतीलच असे नाही. त्यामुळे एखाद्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरण्याआधी त्या ठिकाणाची माहिती करून घ्यावी. तेथील पाण्याचा प्रवाह कितपत वेगवान आहे, पाण्याचे ‘ अंडर करंट ‘ किती आणि कसे आहेत, पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे धोकादायक जीव आहेत, किंवा नाही इत्यादी गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक आहे. नदीमध्ये पोहोण्यासाठी उतरत असताना आपण कुठवर पोहत जाऊ शकतो हे पाहावे, आणि परतत असताना तीरावर येतानाचे मार्ग आधीच मनामध्ये आखून ठेवावेत.

जर आपण पाण्यामध्ये खोलवर जाणार असू, तर आपल्या सुरक्षिततेच्या द्र्ष्टीने सोबत लाईफ जॅकेट किंवा कुठल्याही प्रकारचे फ्लोटेशन डिव्हाईस, म्हणजेच तुम्ही पोहोताना दमलात तर तुम्हाला पाण्यावर तरंगण्यासाठी सहायक ठरेल असे साधन, बरोबर नेण्याचा विचार करा. एखाद्या मोठ्या तलावामध्ये, नदीमध्ये, किंवा समुद्रामध्ये सुरक्षिततेसाठी साधने घेतल्याविना पोहण्यासाठी उतरणे धोक्याचे ठरू शकते.

पाण्यामध्ये शिरण्याआधी पाण्याच्या तापमानाचा अंदाज घेण्यास विसरू नका. स्विमिंग पुलस च्या मानाने नदी किंवा तलावातील पाण्याचे तापमान कमी असण्याची शक्यता असते. जर पाणी खूप थंड असेल, तर हातापायांना होणारा रक्तप्रवाह पोटाकडे वळविला जातो. त्यामुळे पोहोताना अचानक हातपाय शिथिल पडल्याची भावना होऊ शकते. तसेच उंच कड्यावरून पाण्यामध्ये उडी मारण्याची कल्पना चित्रपटामध्ये किंवा जाहिरातींमध्ये बघतना चांगली वाटते, मात्र वास्तवामध्ये असले प्रयोग करणे आवर्जून टाळावे. पाण्यामध्ये शिरताना आधी पावले पाण्यामध्ये बुडवावीत आणि मग हळू हळू सर्व शरीर पाण्यामध्ये जाईल असे पाहावे.

पोहण्यास उतरताना मद्यपान करणे आवर्जून टाळायला हवे. मद्याच्या धुंदीमुळे शरीराच्या क्रिया मंदावतात. त्यामुळे विशेषतः अनोळखी ठिकाणी पोहोण्यास उतरणार असाल, तर सजग राहणे महत्वाचे आहे. तसेच पाण्याचा प्रवाह आणि पाण्याच्या पातळीखालील प्रवाह ( under water currents ) कसे, कोणत्या दिशेला आहेत आणि कितपत वेगवान आहेत, याचा अंदाज घ्या. जर सहज डुंबण्यासाठी नदीमध्ये उतरणार असाल, तर फार खोलवर पाण्यामध्ये शिरू नका. पाणी वरवर कितीही शांत दिसत असले, तरी त्याच्याखाली वेगवान प्रवाह असू शकतात.

जर आपण पोहण्यास उतरणार असलेल्या नदीमध्ये किंवा जलाशायामध्ये जलपर्णी असल्या, किवा शेवाळे असले, तर त्या भागामध्ये पोहण्यास जाऊ नका, यातील काही जलपर्णी शरीरासाठी घातक ठरू शकतात. तसेच शेवाळ्यामुळे अंगावर पुरळ येऊ शकते, किंवा डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होऊ शकते. जर तुम्हाला जेमतेमच पोहोता येत असेल, तर आपल्या बरोबर एखादी अनुभवी, पोहोण्यात तरबेज असलेली व्यक्ती आपल्यासोबत असल्याखेरीज, एकटे पोहोण्यास उतरू नये.

Leave a Comment