‘न्यूड’ रेस्टॉरंट पाठोपाठ आता पॅरिस मध्ये ‘न्यूड’ जिम देखील..!


पॅरिस मधील एका सुप्रसिद्ध वेलनेस सेंटर ने ‘न्यूड ‘ जिमची संकल्पना अस्तित्वात आणली आहे. या जिममध्ये सर्व वयोगटातील ‘न्युडीस्ट’ना, म्हणजेच निर्वस्त्र राहणे पसंत करणाऱ्या सर्व मंडळींना सभासदत्व घेता येणार आहे. या न्यूड जिम मध्ये योग, अॅक्वा एरोबिक्स, जलतरण (पोहणे) आणि इतर व्यायामासाठी जिम सेशन्स असतील. इथे येणारे सभासद निर्वस्त्र असतील इतकेच नाही, तर येथे उपलब्ध असणाऱ्या निरनिराळ्या व्यायामाचे प्रशिक्षण देणारे इंस्ट्रक्टर्स देखील निर्वस्त्रच असणार आहेत.

ह्या नव्या न्यूड जिमची सुरुवात पॅरिस येथील ‘ पॅरिस नॅचरिस्टस् असोसिएशन ‘ या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस हे जिम कार्यरत असेल. येथे व्यायामासाठी येणारे सभासद निर्वस्त्र असले, तरी व्यायामासाठी जी साधने उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करण्यासाठी सभासदांनी टॉवेल्स चा वापर करायचा आहे, म्हणजेच बेंच वर बसून काही व्यायाम करायचा झाल्यास, आधी बेंच वर टॉवेल अंथरून मगच त्यावर बसता येणार आहे. विशेष म्हणजे, पोहोण्यासाठी येणारे सभासद निर्वस्त्र जलतरण तलावामध्ये उतरत असले, तरी पोहोताना त्यांनी डोक्यावर टोपी घालणे बंधनकारक असणार आहे.

ह्या जिमची कल्पना अतिशय लोकप्रिय ठरत असून, इथे येणाऱ्या सभासदांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पॅरिस मध्ये नुकतेच काही काळ आधी ‘ न्यूड ‘ रेस्टॉरंट ही सुरु झाले आहे. इथे एका वेळी चाळीस निर्वस्त्र पाहुण्यांना बसण्याची सोय असून, त्यांना अगदी निवांत वातावरणात येथील चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. या जरा ‘हटके’ असणाऱ्या रेस्टॉरंटचे नाव ‘ ओ नॅचरल ‘ असे आहे.

पॅरिसमध्ये ‘ न्युडीस्ट ‘ ट्रेंड लोकप्रिय होत असून, फ्रांस देशामध्ये एकूण ४६० ठिकाणे ‘ न्युडीस्ट ‘ लोकांकरिता आरक्षित आहेत. यामध्ये १५५ कँपिंग स्पॉट्स, आणि ७३ बीचेस ( समुद्रकिनारा ) चा देखील समावेश आहे. फ्रांस देशाचे रहिवासी असणाऱ्या सुमारे २.६ मिलियन लोकांनी ‘ न्युडीजम ‘ चा स्वीकार, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केलेला आहे. त्यामुळे या मंडळींकरिता न्यूड रेस्टॉरंट, न्यूड बीच, न्यूड जिम या प्रकारच्या संकल्पना अस्तित्वात येणे साहजिक आहे.

Leave a Comment