मालिकांनी जीवन बदलले


आपल्या जीवनात दूरचित्रवाणी या माध्यमाचा शिरकाव होऊन आता तीन दशके होत आहेत. अशा माध्यमांचे आपल्या जीवनावर अनेक परिणाम होत असतात. ते फार कमी गतीने होत असले तरीही तीन दशकांनंतर ते स्पष्टपणे दिसायला लागतात. आता दूरचित्रवाणीने आपल्या झोपेवर फार गंभीर परिणाम केला आहे आणि झोपेचा परिणाम आरोग्यावर झालेला दिसत आहे. टीव्ही मालिका या बदलाला कारणीभूत आहेत. पहिली बाब म्हणजे टीव्हीवरील मालिकांनी आपल्या मनाचा ठाव घेतला आहे. काही काही मालिका या दहा ते साडे दहापर्यंत चालू असतात. त्या बघायच्या म्हटले की, तेवढा वेळ जागणे आलेच. त्या मालिका लहान मुलेही पाहतात. शेवटी मुलांची झोपेची वेळ ही साधारण साडे दहा ते अकरा अशी झाली आहे.

आपल्या जीवनात टीव्हीचा समावेश होण्याच्या आधी आपली झोपेची वेळ काय होती आणि आता काय झाली आहे याचा तपास करायला गेल्यास या वेळेत मोठा बदल झाला असल्याचे लक्षात येते. मग रात्री झोेपायला उशीर झाला की सकाळी उठायलाही उशीर होतो. हाही वेळ आता सकाळी सहावरून आठ ते साडे आठ असा झाला आहे. इतक्या उशीरा उठण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. उशीरा उठल्याने कार्यालयात किंवा शाळेत जाण्याची घाई होते. मग आंघोळ गडबडीने उरकली जाते. व्यायाम तर अशा जीवनपद्धतीतून बादच झाला आहे. त्याचे परिणाम आपल्या पचनशक्तीवर झाले आहेत. डॉक्टर चांगल्या आरोग्यासाठी शांत आणि पुरेशी म्हणजे आठ तास झोप आवश्यक असल्याचे सांगत असतात पण अशा झोपेची कल्पनाही आता करता येत नाही. मुळात ती आठ तास मिळतही नाही आणि मिळाली तरी शांत नसते.

टीव्हीवरील मालिका किती लांबवायच्या हे त्यांना मिळणार्‍या जाहीरातीवर अवलंबून असते. जाहीरात मिळणार असली की मालिका सारख्या लांबवत नेल्या जातात. त्यांच्यात नव नवे प्रसंग घुसवले जातात. कोणत्याही मालिकेत सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचा संघर्ष दाखवला जात असतो. मालिकेचा कोणताही भाग संपवताना दुष्ट पात्रांचा आता विजय होतो की काय असे वाटावे अशी स्थिती निर्माण केली जाते. असा काही तरी प्रसंग निर्माण झाला की आपण अस्वस्थ होतो. आपण आता काय होणार म्हणून बेचैन होतो आणि ही बेचैनी आपल्याला शांत झोपू देत नाही. तिच्यामुळे झोप शांतपणे होत नाही. मालिका संपवून अंथरुणावर आडवे झालो तरीही झोप येत नाही. अशा बेचैनीने पित्तही वाढते. डोकेदुखीही वाढते.

Leave a Comment