अर्थसंकल्पाविषयी रोचक माहिती


केन्द्र सरकारच्या अंदाजपत्रकाविषयी अनेक प्रकारची माहिती प्रसिद्ध होत असते. त्यातल्या त्यात सर्वाधिक वेळा ते सादर करण्याची संधी कोणाला मिळाली याची चर्चा होत असते. हा मान मोरारजी देसाई यांना मिळाला असून त्यांनी १० वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पी. चिदंबरम यांचा क्रमांक नंतर लागतो. त्यांना ही संधी ९ वेळा तर प्रणव मुखर्जी यांना ती ८ वेळा मिळाली आहे. असे हे मान मिळतही राहतील पण मोरारजी देसाई यांना जो एक मान मिळाला आहे तो अन्य कोणालाही मिळालेला नाही. त्यांना १९६४ आणि १९६८ चे अर्थसंकल्प आपल्या वाढदिवसा दिवशी सादर करण्याची संधी मिळाली आहे. मोरारजींचा वाढदिवस हा २९फेब्रूवारीला असे. म्हणजे त्यांनाच आपला हा वाढदिवस दरसाल साजरा करता येत नसे. त्यांना वाढदिवस साजरा करण्याची संधी दर चार वर्षांनी मिळे.

ते १० वेळा अर्थमंत्री असले तरी त्यांना अर्थसंकल्प हा २८ फेब्रूवारीला सादर करावा लागत असे. फेब्रूवारीची २९ तारीख केवळ दर चार वर्षांनीच येते. त्यामुळे १९६४ आणि १९६८ असे दोनदाच त्यांचा वाढदिवस आणि अर्थसंकल्पाचा दिवस एक आला. त्यांचा वाढदिवस २८ तारखेला असता तर त्यांना केवळ सर्वाधिक वेळाच अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली असे न होता कायमच आपल्या वाढदिवसाला अर्थसंकल्प सादर करणारा अर्थमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला असता. मोरारजी पंडित नेहरूंच्याही मंत्रिमंडळात होते आणि इंदिरा गांधी यांच्याही मंत्रिमंडळात होते. त्यांनी १९६९ साली इंदिरा सरकारचा राजीनामा दिला.

त्यावर इंदिरा गांधी यांनी काही काळ अर्थमंत्रीपद सांभाळले. त्या फार कमी काळ या पदावर होत्या पण तेवढ्यानेच त्यांना भारतातली एकमेव महिला अर्थमंत्री असा मान मिळाला. १९९९ पूर्वी अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सायंकाळी पाचची असे पण ९९ साली तेव्हाचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही वेळ बदलली आणि सकाळी ११ वाजता तो सादर करायला सुरूवात केली. मोदी सरकारने अंदाजपत्रकात दोन बदल केले. २०१६ पर्यंत २८ फेब्रूवारीला सादर केले जाणारे अंदाजपत्रक एक फेब्रूवारीला सादर करण्याचा प्रघात पाडला. याच वेळी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्याचाही प्रघात मोडीत काढला. तो अर्थसंकल्या आता सर्वसाधारण अर्थसंकल्पातच मिसळून टाकला आहे. अशा रितीने रेल्वेे अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची ९५ वर्षांची रुढी निकालात निघाली आहे.

Leave a Comment