मुस्लिम महिलेचे बंड


केरळातला मल्लपुरम हा जिल्हा कट्टरतावादी मुस्लिमांचा अड्डा मानला जातो. या जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या मोठी असल्यामुळे त्याला मुस्लिम जिल्हा म्हणून जाहीर करावे अशी मागणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली होती. पण या कट्टरतावादी जिल्ह्यात एका मुस्लिम महिलेेने धार्मिक बंड केले आहे. जमिदा असे या महिलेचे नाव असून ती इमाम आहे. इस्लाममध्ये नमाजाचे नेतृत्व महिलेने करण्याची प्रथा नाही. एखादे वेळी सगळ्या महिलाच नमाज पठण करीत असतील तर त्यांचे नेतृत्व महिला इमाम करू शकते पण नमाज पठण करणारे पुरुष असतील तर त्याचे नेतृत्व महिलेला करता येत नाही. अशा रितीने महिला आणि पुरुष एकत्र नमाज पठण करायला लागले तर त्यातून काही वाईट प्रकार घडण्याची शक्यता असते म्हणून ही बंदी आहे.

जमिका हिने मात्र हा निर्बंध झुगारून दिला असून २६ जानेवारी रोजी मल्लपुरम येथे नमाजाचे नेतृत्व केले आहे. तिच्यासोबत नमाज पठण करणारे सगळे पुरुषच होते. त्यात एकही महिला नव्हती. या प्रकाराने केरळातल्या सनातनी मुस्लिम समाजात खळबळ उडाली असून त्यांनी जमिकाला बहिष्कृत करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला एवढा विरोध होत असला तरीही जमिकाचा निर्धार कायम आहे. तिने आता अशा रितीने पुरुषांच्या नमाजाचे कार्यक्रम राज्यातल्या अनेक शहरांत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे नेतृत्व ती स्वत: घेईल.

जमिका ही कुराण सुन्नत सोसायटी या संघटनेची राज्य सचिव आहे. ही संघटना चेकन्नुर मौलवी या बंडखोर धर्मगुरुंनी स्थापन केली आहे. त्यांनी कुराणच नाही तर इस्लामचाच अर्थ गैरपारंपरिक पद्धतीने लावला होता. त्यांचे बंड सनातनी लोकांना पचले नसल्याने १९९३ साली त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. आता जमिका ही त्यांच्या बंडखोर विचारांचा वारसा पुढे चालवीत आहे. आपलेही काही असेच होईल असे तिला वाटते पण तिला त्याची पर्वा नाही. आपण सांगतो तोच कुराणाचा खरा अर्थ आहे आणि कुराणात कोठेही महिलांना नमाजाचे नेतृत्व करण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिलेला नाही असा तिचा ठाम विश्‍वास आहे. त्यामुळे आपण करीत आहोत ते बंड नसून खरे धर्माचरण आहे असे तिचे म्हणणे आहे. जगातली नमाजाची नेतृत्व करणारी महिला हा मान अमेरिकेतल्या अमिना वदूद हिला लाभला आहे. तिने हे साहस २००५ साली केले होते. आता जमिका ही असा मान मिळवणारी भारतातली पहिली महिला ठरली आहे.

Leave a Comment