
सध्या आपल्या अर्थव्यवस्थेविषयी काहीही बोलले आणि लिहिले जायला लागले आहे. साधारणत: सरकारची नीती चुकीची आहे असे दर्शविणे आणि जे काही चालले आहे ते ठीक नाही हे लोकांच्या मनावर ठसवणे हा या बोलण्यामागचा हेतू आहे. त्यातल्या त्यात रोजगार निर्मिती हा अशा अर्थतज्ज्ञांचा आवडता विषय झाला आहे. कसला तरी एखादा आकडा मागचा पुढचा संदर्भ सोडून नमूद करायचा आणि रोजगार निर्मिती घटली म्हणून बभ्रा करायचा असा या लोकांचा खाक्या आहे. नोकरी म्हणजे रोजगार अशी काही लोकांची कल्पना असते पण कोणाला तरी नोकरी हवी असेल तर ती कोणीतरी निर्माण केली पाहिजे. म्हणजे जोपर्यंत देशातले काही लोक नोकर्या निर्माण करणार नाहीत तोपर्यंत कोणाला तरी नोकर्या मिळणार नाहीत.
नोकरीची मानसिकता
पंतप्रधान नरेन्द्र मोदी असोत की आणखी कोणते पंतप्रधान असोत त्यांनी वारंवार ही गोष्ट सांगितली आहे की, सरकार सर्वांना नोकर्या देऊ शकत नसते. ज्यांना सरकारी नोकरी लागणार नाही त्यांना खाजगी नोकरी करावी लागेल. पण, ज्यांना ती मिळवता येत नसेल त्यांना छोटा मोठा स्वत:चा म्हणजे स्वयंरोजगार निर्माण करावा लागेल. यात काही वादग्रस्त नाही. म्हणूनच मोदी यांनी भजी तयार करून विकणे हाही रोजगारच असतो असे म्हटले. आता या म्हणण्यात चूक काय? पण माजी मंत्री पी. चिदंबरम यांना हे म्हणणे मान्य नाही. भजी तयार करून विकणे हा जर रोजगार असेल तर मग भीक मागण्यालाही रोजगारच म्हणावे लागेल अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे. आता या पी. चिदंबरम यांचे डोके ठिकाणावर आहे की नाही हेे तपासून पाहण्याची आता वेळ आली आहे.
कष्ट करून स्वत:ची कमायी करणारा भजी विक्रेता हा भीक मागणार्यांसारखा कसा असू शकेल ? मग भजी विकणाराला नोकरी मिळाली तरच त्याला रोजगार म्हणावे हे चिदंबरम यांचे म्हणणे मान्य करायचे झाले तर प्रश्न असा निर्माण होईल की, त्याला रोजगार म्हणजे नोकरी देण्यासाठी कोणाला काही तरी तयार करावेच लागेल ना?
अशा स्थितीत त्या नोकरी करणार्याला रोजगार मिळाला असे म्हणता येईल पण ती नोकरी कोणी तरी निर्माण केलेली असेल आणि त्यासाठी तो काही तरी तयार करीत असेल. मग तो काही तरी तयार करणारा मात्र पी. चिदंबरम यांच्या दृष्टीने भिकार्याच्या पातळीवर आला असे म्हणावे लागेल. चिदंबरम यांची व्याख्या विचित्र आहे. नोकरी करणारा रोजगारी आणि ती निर्माण करणारा मात्र भिकारी.
