अफगाणिस्तानातला हिंसाचार


अफगाणिस्तानची राजधानी काबूल हे शहर सुमारे ५० लाख वस्तीचे पण या शहरातले लोक शांततेने जीवन जगू शकत नाहीत. २० वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या कराची या सर्वात मोठ्या शहरात असेच वातावरण होते आणि दररोज काही लोकांच्या हत्या होत होत्या. आता काबूल शहराची अवस्था अशीच झाली असून गेल्या महिनाभरात या शहरात तीन मोठे बॉंबस्फोट झाले आहेत. काल झालेल्या स्फोटात तर ९५ जण ठार तर १५८ जण जखमी झाले आहेत. काबुल शहराच्या गजबजलेल्या भागात आणि अमेरिकेच्या वकिलातीच्या जवळ तसेच नाटोच्या कार्यालयाशेजारी हा स्फोट झाला. स्फोट करण्यासाठी वापरलेली स्फोटके एका रुग्णवाहिकेतून आणलेली होती.

खरे तर हे वाहन रुग्णवाहिका नव्हते तर मालमोटार होते आणि त्याला रंगरंगोटी करून रुग्णवाहिका वाटावी असे सजवण्यात आले होते. तरीही या कडक बंदोबस्त असलेल्या भागात या रुग्णवाहिकेला अडवले होते पण दुसर्‍या क्रमांकाच्या सुरक्षा कडीतून हे वाहन सुटले आणि त्यात भरलेल्या स्फोटकाचा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात काही पोलीस बेपत्ता आहेत. ते मारले गेले असावेत असा अंदाज आहे. एवढी प्राणहानी झालेला हा गेल्या दोन तीन वर्षातला एकमेव स्फोट आहे. यात लहान मुले आणि निष्पाप महिलाही ठार झाल्या आहेत. काही पोलीस वगळले तर ठार झालेले बहुतेक लोक हे नागरिक आहेत. आजवर अफगाणिस्तानातला हिंसाचार म्हटला की त्याच्यामागे तालीबान अतिरेकी असणार असे मानले जात होते. पण आता तालीबान संघटनांच्या शिवाय इस्लामिक स्टेट (आय एस) हीही संघटना या देशात कार्यरत झाली आहे.

अफगाणिस्तानात २०१६ पासून झालेल्या काही स्फोटांचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की तेव्हा पासूनच आय एस ने या देशात हातापाय पसरायला सुरूवात केली आहे. २०१६ च्या जुलै मध्ये काबुल शहरात असाच मोठा स्फोट झाला होता. तो स्फोट या दोन्ही संघटनांनी मिळून केला असावा असा अंदाज आहे. त्यात ८५ लोक ठार तर ४०० पेक्षाही अधिक लोक जखमी झाले होते. अशा स्फोटात आय एस चाच मोठा हिस्सा असतो. आय एस ने गेल्या दीड वर्षात २० हल्ले केले आहेत. हे प्रमाण वाढवता यावे यासाठी या संघटनेने काही विद्यार्थी, व्यावसायिक, प्राध्यापक आणि महिलांचे गोपनीय असे आखाडे तयार केले आहेत. शिवाय शस्त्रांची मोठी जमवाजमव केली आहे.

Leave a Comment