आंध्रातली भाजपा सेनेच्या वळणावर


भारतीय जनता पार्टी कर्नाटकात येत्या काही महिन्यांत होणारी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसत असतानाच भाजपाचे नेते शेजारच्या आंध्र प्रदेशातली तेलुगु देसम पक्षाशी असलेली युती धोक्यात येईल अशी विधाने करायला लागले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत सहभागी असतानाही आपलाच सहभाग असलेल्या सरकारवर टीका करीत सुटली आहे तशी भाजपाही आंध्रात वर्तन करीत आहे. तिथे गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते आपलाच सहभाग असलेल्या सरकारवर टीका करीत आहे. अशा टीकेने त्रस्त झालेले मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला निर्वाणीचा इशारा दिला आहे आणि अशी टीका सुरू राहिली तर आपल्या पक्षाला आपला वेगळा मार्ग चोखाळावा लागेल असा स्पष्ट इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातली शिवसेना आणि आंध्रातली भाजपा यांच्यात फरक मात्र आहे. त्यानुसार तिथे भाजपाचे नेते सतत सरकारमधून बाहेर पडण्याच्या वल्गना करीत नाहीत. पण वेळ पडल्यास आंध्रात आपला पक्ष वाय एस आर कॉंग्रेसशी युती करायला मागेपुढे पाहणार नाही असे बजावत आहेत. अर्थात ही धमकीच आहे पण तिला वाय एस आर कॉंग्रेसने प्रतिसाद दिला आहे. असे असले तरीही ही गोष्ट सोपी नाही कारण भाजपाची केन्द्रात या वाय एस आर कॉंग्रेसशी युती नाही. तिथे भाजपाची युती तेलुगु देसमशी आहे आणि राज्यातही याच पक्षाशी युती आहे. तेव्हा कोणी काहीही म्हटले तरीही तेलुगु देसम आणि भाजपाची युती तुटण्याची काही शक्यता नाही. मात्र मुख्यमंत्री नायडू यांनी भाजपाच्या केन्द्रीय नेत्यांनी राज्यातल्या नेत्यांना आवरावे असे आवाहन केले आहे.

दुसर्‍या बाजूला वाय एस आर कॉंग्रेसने या दुहीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला असून उगाचच आपण भाजपाशी युती करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सूचित करायला सुरूवात केली आहे. अर्थात हे करताना त्यांनी वर्मावर बोट ठेवले आहे. तेलुगु देसमचे भाजपाशी मैत्रीचे संबंध असले तरीही मोदी सरकारकडून राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्यात तेलुगु देसमला अपयश आले आहे. याचा उल्लेख न करता या पक्षाच्या नेत्यांनी, मोदी सरकारने असा स्वतंत्र दर्जा दिला तर आपला पक्ष केन्द्रात तर या सरकारला पाठींबा देईलच पण राज्यातही भाजपाशी युती करू असे जाहीर केले आहे. अर्थात या पक्षाशी युती करणे भाजपाला परवडणारे नाही. मात्र भाजपाच्या नेत्यांना सद्बुद्धी सुचली पाहिजे.

Leave a Comment