त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याकरिता वापरा मुलतानी माती


बाजारामध्ये नवनवीन सौंदर्यप्रसाधने सतत येतच असतात. त्वचेची निगा राखण्यापासून ते हातापायांची, केसांची काळजी घेण्यासाठी ही सौंदर्यप्रसाधने बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण कितीही उत्तम प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरली, तरी त्यांच्यामध्ये कृत्रिम घटकही असतातच. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक साधने वापरणे हा उत्तम पर्याय ठरत आहे. अश्याच साधनांपैकी एक म्हणजे मुलतानी माती. मुलतानी मातीचा वापर सौंदर्यप्रसाधन म्हणून गेलो कित्येक शतके होत आला आहे. आज ही या मातीचा वापर त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी केला जातो.

मुलतानी माती ही एक विशिष्ट प्रकारची माती आहे. कोणत्याही तेलाला किंवा तरल पदार्थाला रंगहीन करण्याची क्षमता या मातीमध्ये आहे. तसेच त्वचेवरील तेलकटपणा शोषून घेण्याची क्षमता या मातीमध्ये आहे. म्हणूनच ज्यांची त्वचा अतिशय तेलकट असून ज्यांना त्यामुळे वारंवार ‘अॅक्ने’ चा त्रास होतो, त्यांच्यासाठी मुलतानी मातीचा लेप अतिशय गुणकारी ठरतो. तसेच काहींच्या केसांमध्ये वारंवार कोंडा होत असतो. कोंडा घालविणारे अनेक शॅम्पू, सिरम्स वापरूनही केसांमधील कोंडा कमी होत नाही. अश्यावेळी मुलतानी मातीचा वापर केल्यास केसांमधील कोंडा नाहीसा होण्यास मदत होते. तसेच केस वारंवार धुवूनही तेलकट होत असतील, तर केसांवर मुलतानी मातीचा लेप द्यावा. त्याने केसांमधील अतिरिक्त तेल शोषले जाऊन केसांचा तेलकटपणा कमी होईल. पण जर केस कोरडे असतील, तर मात्र मुलतानी मातीचा वापर टाळावा, अन्यथा केस आणखी कोरडे होतील.

केसांसाठी मुलतानी माती लावायची झाल्यास, रात्री झोपण्यापूर्वी मुलतानी माती पाण्यामध्ये कालवून घेऊन त्याची साधारण घट्ट पेस्ट बनवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ही पेस्ट केसांच्या मुळांशी लाऊन चांगली मालिश करावी. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. जर मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यासाठी करायचा असेल, मुलतानी मातीमध्ये गुलाबजल किंवा लिंबाचा रस घालून हा लेप चेहऱ्यावर लावावा. ह्या लेपामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा कमी होईलच, शिवाय चेहऱ्यावरील काळे डाग, किंवा उन्हामुळे चेहऱ्यावर आलेला काळसरपणा देखील दूर होईल. मात्र फार कोरडी त्वचा असणाऱ्यांनी मुलतानी मातीचा वापर टाळावा.