सध्या सोशल मीडिया सोपा झाला आहे आणि स्वस्तही झाल्यामुळे त्याचा व्यापक वापर होत आहे. पण हा वापर नेमका कशासाठी होत आहे आणि त्याची उपयुक्तता काय असा प्रश्न विचारल्यावर हातात निराशाच येते. कारण हातात स्मार्टफोन आहे आणि तो वापरता येतो म्हणून नेहमी काही तरी आणि कोणाला तरी पाठवत राहणे हा काही लोकांचा चाळाच झाला आहे. त्यामुळेच त्याचे रूपांतर व्यसनात झाले आहे. भारतात सोशल मीडियातली ३० टक्के जागा गुड मॉनिर्ंगचे संदेश आणि क्षणाक्षणाला काढलेले फोटो यांनी व्यापलेली आढळते. हे संदेश निव्वळ औपचारिक असतात. त्यातल्या त्यात भारतात सणांना काही तोटा नाही. त्या प्रत्येक सणाला सर्वांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचेही काम अनेक लोक करीत राहतात.
सोशल मडियाचा अनावश्यक वापर
एरवी असे संदेश आपण ज्यांना पाठवले नसते त्यांना केवळ फोनची सोय आहे आणि सहज संदेश पाठवता येतो म्हणून त्यांना संदेश पाठवला जातो आणि ज्यांना तो पाठवला जातो त्यालाही नाइलाजाने का होईना पण त्याला प्रतिसाद द्यावा लागतो. त्यात दोघांचाही वेळ जातो. या संदेशातून साध्य काहीच होत नाही. असाच प्रकार वाढदिवसांचा आणि उगाच वारंवार बदलल्या जाणार्या प्रोफाईल फोटोचा असतो. आता क्षणाक्षणाला सेल्फी काढून ती सर्वांना पाठवण्याचेही फॅड वाढत आहे. एखादे माध्यम आपल्याला उपलब्ध होते तेव्हा त्याचा जास्तीत जास्त उपयुक्त वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण आपण त्याचा गैरवापर करीत आहोत.
नाही म्हणायला काही उपयुक्त माहिती पाठवली जात असते पण ती अनेक ग्रुपवरून जशास तशी रिपीट केली जाते. तेव्हा उगाच लोकांच्या पोस्ट तशाच पुढे पाठवण्याचा उद्योग करण्याऐवजी आपली स्वत:ची पोस्ट असेल तर ती पाठवावी. म्हणजे लोकांचा त्याच त्या पोस्ट पाहण्यात जाणारा वेळ वाचेल. काही वेळा काही लोक अशा सूचनांच्या पोस्ट पाठवून या माध्यमाचा चांगला वापर व्हावा याचा प्रयत्न करतात पण त्यांना कोणी दाद देत नाही. अमेरिकेत आणि भारतात या बाबत गुगलने एक पाहणी केली. तेव्हा या दोन देशात सोशल मीडियाचा वापर करण्यात बराच फरक असल्याचे दिसून आले. भारतातल्या स्मार्ट फोन मधील ३० टक्के स्पेस ही अशा निरर्थक संदेशांनी आणि निष्कारण काढलेल्या फोटांेंनी भरलेली आढळली. सोशल मीडियाचा मोठा वापर करणारा देश म्हणून याच सोबत अमेरिकेचीही पाहणी केली असता अमेरिकेतल्या स्मार्ट फोनची केवळ १० टक्के एवढीच मेमरी अशा संदेशांनी भरलेली दिसली.