आठवण एका घोड चुकीची


१९९६ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला १६५ जागा मिळाल्या पण त्याला कोणीच पाठींबा न दिल्याने भाजपाचे सरकार सत्तेवर आले नाही. कॉंग्रेसला १९५ जागा मिळाल्या होत्या पण कॉंग्रेसनेही सरकार स्थापन करण्यास नकार दिला. तेव्हा तिसरी शक्ती म्हणवणार्‍या अनेक पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचे ठरविले पण या आघाडीचा नेता कोण हे काही ठरेना. सर्वमान्य पण वादातीत असा नेता म्हणून ज्योती बसू यांना या पदाची ऑफर द्यावी असे आघाडीत ठरले. आघाडीच्या घटक पक्षात याबाबत एकमत झाले कारण ज्योती बसू यांना अनेक पक्षांची आघाडी असलेले सरकार चालवण्याचा अनुभव होता आणि ते चारित्र्याने निष्कलंंक होते.

आघाडीत असे एकमत झाले पण ज्योती बसू यांच्या माकपा पक्षाने ही ऑफर नाकारली. आपला पक्ष नेतेपदापासून दूर राहणार असल्याने ज्योती बसू यांच्या पंतप्रधान होण्याचा काही प्रश्‍नच नाही असा निरोप पक्षाने आघाडीच्या नेत्यांना दिला. ज्योती बसू यांची पंतप्रधानपदाची संधी गेली. या बाबत ते स्वत: तर नाराज होतेच पण पक्षातल्याही काही नेत्यांना आपण हे पद सोडले याचे वैषम्य आहेे. ज्योती बसू यांनी नंतर यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, ही पक्षाची घोडचूक होती असे म्हटले. अर्थात ते पक्षाशी एकनिष्ठ असल्याने त्यांनी पक्षाचा आदेेश मानला. पक्षाच्या या निर्णयामागे प.बंगाल शाखा विरुद्ध केरळ शाखा असे दोन गट असल्याचेही म्हटले गेले. आता ज्योती बसू हयात नाहीत पण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चिरंजीवांनी एक लेख लिहिला असून आपल्या वडिलांंची ही संधी गेली यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आता आपण या घटनेचा विचार करतो तेव्हा पक्षाचा निर्णय योग्यच होता असे वाटते कारण त्यावेळी राजकीय स्थिती एवढी वाईट होती की तेव्हा पंतप्रधान होण्यात काही अर्थच नव्हता. ते सरकार कॉंग्रेसच्या बाहेरच्या पाठींब्यावर उभे राहणार होते आणि कॉंग्रेस कधीही पाठींबा काढून घेऊन सत्ताधारी आघाडीचे हसे करणार हे ठरलेले होते. या देशात केन्द्रात कॉंग्रेस शिवाय कोणालाही स्थिर सरकार देता येत नाही हे सिद्ध करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न होता. तेव्हा ज्योती बसू पंतप्रधान झाले असते तरी कॉंग्रेसने चार दोन महिन्यात पाठींबा काढून घेऊन त्यांना औट घटकेचे पंतप्रधान करून टाकले असते. बसू यांच्या ऐवजी पंतप्रधान झालेले देवेगौडा आणि त्यांच्यानंतर याच आघाडीचे पंतप्रधान झालेले गुजराल यांना कॉंग्रेसने एक वर्षातच पदभ्रष्ट केले. पंतप्रधानांच्या नावांची यादी करायला गेलो तर ही दोन नावे आठवतही नाहीत. बसू यांचे तसेच झाले असते. तेव्हा ते पंतप्रधान झाले नाहीत हेच बरे झाले.

Leave a Comment