अग्नीची धग


भारताने आता अग्नी ५ या सर्वात प्रगत अशा क्षेपणास्त्राची चाचणी केली असून ती यशस्वी झाली आहे. या यशाची जगाने दखल घेतली आहे. पाकिस्तान तर हादरूनच गेले आहे. पाकिस्तानकडे अणुबॉंब आहे आणि अधुन मधुन पाक नेते भारताला त्याची धमकी देत असतात पण तेवढे एक अस्त्र सोडले तर पाकिस्तान भारताच्या पासंगालाही पुरत नाही कारण अग्नी क्षेपणास्त्रांच्या मालिकेतल्या एकेका क्षेपणास्त्राचा वेग आणि नेमकेपणा एवढा अचूक आहे की भारत-पाक पेटलेच तर भारताच्या अग्नी क्षेपणास्त्राने पाकिस्तानचा कोपरा न कोपरा काही क्षणात भाजून काढता येतो. पाकिस्तान बाबत एक विनोद सांगितला जातो. भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध पेटलेच तर पाकिस्तान भारताला भारी पडेल असे पाकिस्तानातल्या ९० टक्के लोकांना वाटते. पण १० टक्के लोेकांना भारत भारी पडेल असे वाटते. ते १० टक्के लोक लष्करात आहेत.

एकंदरीत अग्नीची ताकद एवढी आहे की आता तर त्याच्या पाचव्या आवृत्तीमुळे पाच हजार किलो मीटर पर्यंत मारा करतो येतो. त्याचे तपशील आता सर्वांना माहीत झाले आहेत. मात्र अग्नी ही क्षेपणास्त्र मालिका विकसित करताना भारतीय शास्त्रज्ञांना अनेक संकटांना आणि अडचणींना सामोरे जावे लागले आहे. ही मालिका विकसित करताना आपल्याला वजनाला हलका पण उत्कलन बिंदू वरचा असणारा धातू वापरावा लागेल असे लक्षात आले होते. असा धातू म्हणजे बेरिलियम. हा धातू आवश्यक होता पण तो तयार करण्याच्या बाबतीत अमेरिकेची मक्तेदारी होती. आपण अमेरिकेकडे तो मागितला पण अमेरिकेने तो आपल्याला दिला नाही.

क्षेपणास्त्रांच्या विकासात आपल्या शिवाय कोणीही प्रगती करू नये म्हणून अमेरिकेने भारताला हा धातू नाकारला असला तरीही भारतीय शास्त्रज्ञांनी भारतात या धातूचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा भारतात त्याचे मोठे साठे असल्याचे लक्षात आले. अर्थात तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट माहीत नव्हती. अमेरिकेने नकार दिल्यामुळे आपल्याला त्याचा शोध घेण्याची गरज भासली. अमेरिकेने नकार दिला नसता तर आपल्याला या गोष्टीची जाणीवही झाली नसती. आता आपण अग्नी क्षेपणास्त्रांत आपल्या देशात सापडलेलाच हा बेरिलियम वापरतो. तो अमेरिकेतून आणला असता तर खूपच महागही पडला असता. आता तो स्वस्त पडतो. म्हणून आपले अग्नी क्षेपणास्त्र कमी किंमतीतही तयार होऊ शकते.

Leave a Comment