इस्रायल एवढे समर्थ का ?


भारत देश सध्या अनेक देशांतून मदत घेत आहे आणि तिथून आपल्या देशात मोठी गुंतवणूक यावी म्हणून धडपडत आहे पण या बाबतीत दोन देशांचे कौतुक करावेसे वाटते. त्यातला एक देश आणि जपान आणि दुसरा आहे इस्रायल. या दोन देशांची भारताला मोठी मदत होतही आहे पण या मदतीत एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. हे दोन्हीही देश फार लहान आहेत आणि ते भारतासारख्या महान देशाला तांत्रिक आणि आर्थिक मदत करीत आहेत. जपानचे पंतप्रधान ऍबे भारताच्या दौर्‍यावर असतानाही या गोष्टीची चर्चा झाली आहे आणि आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा दौरा सुरू असतानाही याची चर्चा होत आहे. हे दोन देश लहान असूनही एवढे समर्थ कसे बनले हे जाणून घेण्याचा प्रयत्न अनेकजण करीत आहेत.

जपान हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत महाराष्ट्राएवढा देश आहे. महाराष्ट्राला एखादा भूकंपाचा धक्का बसला की महाराष्ट्र हादरून जातो, घाबरून जातो. पण जपानला रोजच धक्के बसतात पण तिथले लोक घाबरत नाहीत. जपान हा आर्थिक बाबतीत जगातला तिसरा देश आहे आणि आता जपानच्या सौजन्याने भारतात बुलेट ट्रेन यायची आहे. इस्रायल हा तर जपानपेक्षा लहान देश आहे. त्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांएवढे आहे. लोकसंख्या ८० लाख म्हणजे मणिपूरएवढी आहे. पण त्याची क्षमता भारतापेक्षा मोठी आहे. यामागचे रहस्य काय आहे?

मुळात जपानला दुसर्‍या महायुद्धात मोठ्या विनाशाला तोेंड द्यावे लागले आहे. इस्रायलची तर दुसर्‍या महायुद्धाच्या राजकारणातून नवा देश म्हणून निर्मिती झाली. १९४५ ते ५० नंतर या दोन देशांनी उभारणीचे प्रयत्न सुरू केले. पण जगात आघाडी घेतली आहे. या दोन्ही देशांतल्या जनतेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रखर देशभक्ती. त्यातूनच ते मोठे उद्योगी बनले असून शिस्तीत काम करण्याची त्यांना सवय आहे. शिस्त आणि परिश्रम करण्याची तयारी यामुळे त्यांना हे महत्पद मिळाले आहे. जपानी लोक कधी संप करीत नाहीत. कामगारांचे काही गार्‍हाणेच असेल तर ते आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी संप करीत नाहीत. काम बंद पाडत नाहीत तर जादा तास काम करून आपली नाराजी व्यक्त करतात. इस्रायलमध्ये वयाच्या १८ व्या वर्षापासून ते २२ व्या वर्षापर्यंत सर्वांना सक्तीच्या लष्करी सेवेत दाखल व्हावे लागते. याला मुलीही अपवाद नाहीत. या सेवेमुळे प्रत्येकाच्या अंगी काम करण्याची वृत्ती असते आणि देशभक्तीही निर्माण झालेली असते.

Leave a Comment