आता पूजा बंद करा


मोदी सरकारने हाज यात्रेला जाणार्‍या मुस्लिम बांधवांची सबसिडी बंद केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता सेक्युलर सरकार आणि धामिॅक कार्याला दिली जाणारी सरकारी मदत यावर चर्चा सुरू होणार आहे. सरकार हे धर्मातीत असल्यामुळे कोणत्याही एका धर्माला किंवा कोणत्याही धर्माला सरकारने अशी मदत करणे चुकीचे असते. म्हणून हाज यात्रेकरूंची सबसिडी बंद करण्याची मागणी प्रामुख्याने हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांची होती. त्यांनी आता अशा प्रकारे हिंदू धर्माला दिली जाणारी मदतही बंद करण्याचा आग्रह धरला पाहिजे. काही राज्य सरकारे हिंदू भाविकांना अशी मदत करतात तेव्हा तीही मदत बंद झाली पाहिजे. मुस्लिमांची मदत बंद तर हिंदूंचीही मदत बंद करण्यातच खरा न्याय आहे.

अन्यथा हाज यात्रेची मदत बंद करायची आणि हिंदूंची मदत मात्र जारी ठेवायची हा अन्याय ठरेल. या बाबत एक खुलासा केला पाहिजे की धर्माची दोन अंगे आहेत. एक अंग कर्मकांडात्मक असते. ते अंग धार्मिक असते. म्हणजे कोणी कोणती पूजा करावी ? नमाज पठण कोणती मांडी घालून करावे याचा निर्णय सरकार देऊ शकत नाही. महादेवाला प्रदक्षिणा कशी घालावी यावर वाद झाला तर त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. हा धर्माचा कर्मकांडाचा भाग आहे. पण मंदिराच्या आणि मशिदीच्या जागेच्या मालकीवरून वाद झाला तर सरकार हस्तक्षेप करू शकते. तो काही धर्माचा भाग नाही. यात्रेकरूंच्या सोयीसाठी काही खर्च करणे यात धर्म नाही. त्यावर सरकार खर्च करू शकते. ते काही चूक नाही.

एखाद्या देवाची सरकारी पूजा ही मात्र धर्मातीत धोरणांशी विसंगत आहे. कारण सरकार हे काही कोणत्या धर्माचे नसते. महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठ्ठलाची सरकारी महापूजा होत असते आणि ती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. ही पूजा मात्र धर्मातीत धोरणात बसत नाही. खरे तर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. तिथे हा प्रकार चालता कामा नये. पूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे वेदमंत्रांचे पठण करणारांना काही अनुदान दिले जात होते. पण महाराष्ट्रातल्या काही पुरोगामी समाजवादी नेत्यांनी या प्रकाराला हरकत घेतली आणि ही दक्षिणा बंद पाडली. पण या पुरोगामी विचारवंतांंना विठ्ठलाची सरकारी पूजा कशी चालते हे काही कळत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरे सेक्युलर असतील तर त्यांनी ही पंढरपूरची सरकारी पूजा बंद करण्याची हिंमत दाखवली पाहिजे.

Leave a Comment