हिंदू राष्ट्र म्हणजे काय ?


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी भीमा कोरेगाव प्रकरणानंतर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दलितांच्या भावना दुखावतील असे काहीही न करण्याची आणि न बोलण्याची सूचना केली होती. कारण त्यांनी दलितांची मने जिंकण्याचा प्रयास सुरू केला आहे. त्या शिवाय त्यांनी तीन तलाकच्या रुढीला विरोध करून तसा कायदा पास करीत आणला आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष शहरी मतदारांच्या पाठिंब्यावर उभा असल्याची तर टीका होतेच पण तो पक्ष उच्चवर्णियांचा असल्याचाही प्रवाद आहे. दलित आणि मुस्लिम या दोन वगार्र्ंमध्ये भाजपाचा दुस्वासच केला जातो. पण मोदी यांनी दलितांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करून आणि मुस्लिम महिलांची मने जिंकून पक्षाचा जनाधार व्यापक करण्याचा प्रयास सुरू केला आहे. भारतीय जनता पार्टीत असे काही नेते आहेत की त्यांना यातले काहीही कळत नाही. ते जुनाच बाणा दाखवण्यात गुंग आहेत.

उत्तर प्रदेशातल्या एका भाजपा आमदाराने पुन्हा एकदा हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे. हा विषय विकासाच्या अजेेंड्यातून बाहेर पडला होता पण या आमदाराने नको तेव्हा तो पुन्हा उपस्थित केला आहे. अशा घोषणा करण्याने पक्षाचा विस्तार करण्याच्या आपल्या नेत्यांच्या प्रयत्नांना खिळ बसते याची त्यांना कसलीही कल्पना नसते.खरे तर भारतीय जनता पार्टीने हिंदू राष्ट्र हे आपले उद्दिष्ट असल्याचे कधीच म्हटलेले नाही. कधी तरी जुन्या काळात ती घोषणा पक्षाने किंवा जनसंघाने केलीही असेल पण आताच्या काळात या घोषणेला काहीही अर्थ नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. मात्र तरीही काही कट्टर लोकांना अधूनमधून तशी उबळ येते आणि ते पक्षाच्या सध्याच्या वाटचालीला धोका पोचवतात.

आजवर भाजपा किंवा संघाच्या नेत्यांनी कधी तरी हिंदु राष्ट्र निर्माण करण्याच्या वल्गना केल्या आहेत पण हिंदू राष्ट्र म्हणजे नेमके काय याचा कधीच खुलासा केलेला नाही. ज्या ज्या वेळी असा प्रश्‍न उपस्थित केला जातो तेव्हा संघ नेत्यांची उत्तरे परस्परांशी विसंगत, संदिग्ध आणि भोंगळपणाची असतात. संघातल्या काही नेत्यांना हिंदू राष्ट्र करण्याची इच्छाच असेल तर त्यांनी त्याची स्पष्ट कल्पना मांडली पाहिजे. त्या हिंदू राष्ट्राचे कायदे कोणते असतील? घटना कोणती असेल? राज्यपद्धती कोणती असेल? सांसदीय असेल की आणखी कसली असेल ? या प्रश्‍नाची योग्य त्या रितीने उत्तरे दिली पाहिजेत. उगाच अधुनमधून पुंग्या सोडून देणे बंद केले पाहिजे.

Leave a Comment