स्कॉलर गेला गंगा स्नानाला


जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आता सनसनाटी बातम्यांचे केन्द्रच झाले आहे. दोन वर्षांपूर्वी याच विद्यापीठात, अफझलचा कळवळा असलेल्यानी देेशविरोधी घोषणा देऊन वातावरण तापवले होते आणि त्यातूनच कन्हैय्याकुमार हे प्रकरण पुढे आले. या पार्श्‍वभूमीमुळे या विद्यापीठात घडणारी छोटी मोठी घटनाही बातमीचा विषय होते. गेल्या आठवड्यात या विद्यापीठातला संशोधन करीत असलेला मुकूल जैन हा विद्यार्थी गायब झाला. तो अचानक गेला आणि कोठे गेला याचा काही सुगावा लागेना म्हणून विद्यापीठात तणाव निर्माण झाला. तीन चार दिवस तर त्याचा काहीच पत्ता लागला नाही आणि चर्चेला सुरूवात झाली. अनेक जण अनेक प्रकारचे अंदाज व्यक्त करायला लागले.

विद्यार्थी गायब होण्याचा एक प्रकार पूर्वी या विद्यापीठात घडला असल्यामुळे मुकुल जैन याच्या गायब होण्याचे प्रकरण अधिक गूढ झाले. २०१६ साली एक विद्यार्थी गायब झाला आहे. तो गायब होण्याच्या आदले दिवशी त्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी काही वाद झाला होता. वादानंतर तो बेपत्ता झाल्याने या बेपत्ता होण्याशी विद्यार्थी परिषदेचे नाव जोडले गेले. तो मुलगा अजूनही बेपत्ताच आहे. या प्रकारानंतर हा मुकूल जैनचा प्रकार घडला आणि तो दोन तीन दिवस सापडला नाही. त्यामुळे या प्रकाराचे गूढ वाढत चालले. शेवटी गेल्या गुरूवारी त्याचा पत्ता लागला. पत्ता लागला म्हणजे तो स्वत:हूनच विद्यापीठाच्या वसतिगृहात प्रकट झाला.

विद्यापीठाने तसे अधिकृतपणे जाहीर केले. तो गेला होता कोठे आणि असा बेपत्ता झाल्यागत का निघून गेला होता तसेच त्याने आपल्या जाण्याविषयी कोणालाच कल्पना का दिली नाही व नंतरही कोणालाच काही का सांगितले नाही याची चौकशी अजून व्हायची आहे पण तो प्रकटला याचाच विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला आनंद आहे. तो पाटण्याला गेला होता. तिथे त्याला गंगा नदीत स्नान करायचे होते असे त्याने सांगितले. या पेक्षा जास्त खुलासेवार तो काही बोलत नाही. विज्ञान विषयक प्रकरणावर पीएच. डी. करणार्‍या त्याच्या सारख्या व्यक्तीने, संशोधकाने गंगा नदीत स्नान करायला काम सोडून जावे अशी अपेक्षाच नव्हती. एक संशोधक अशा अंध:श्रद्धा उराशी बाळगतो हा आपल्या शिक्षणाचा अपमान आहे. अर्थात तो आता कोणत्या मन:स्थितीत गंगा स्नानाला गेला होता याचा उलगडा होईलच पण त्याला कोणी पळवून नेले नव्हते याची खात्री झाली असल्याने विद्यापीठाला समाधान आहे.

Leave a Comment