पंजाबात नव्या दहशतवादाची वळवळ


पंजाबात आता नव्या दहशतवादी शक्तींची जाणीव व्हायला लागली आहे. या नव्या पिढीतल्या अतिरेक्यांच्या मनावर खलिस्तान मागणीचा प्रभाव आहे पण त्यांचा समाजावर काहीच प्रभाव नाही त्यामुळे तसे पोलीस निश्‍चिंत आहेत पण या नव्या पिढीतल्या दहशतवाद्यांचे स्वरूप पाहून ते चक्रावून गेले आहेत. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत दंगली होऊन तीन हजारावर शीखांना जाळून मारण्यात आले होते. त्याची चिड असलेले लोक अशा दहशतवादी कारवायांत सामील होऊ शकतात पण हे नवे अतिरेकी या हत्येनंतर जन्मलेले आहेत. पंजाबातला हिंसाचार, स्वर्ण मंदिरातली लष्करी कारवायी आणि दिल्ली दंगल या घटना ३० वर्षांपेक्षा जुन्या आहेत पण हे नवे अतिरेकी विशीतले आहेत. म्हणजे हा प्रकार पूर्णपणे नवा आहे.

या लोकांची खासियत अशी की त्यांच्यात स्थानिक संबंध असलेल्या तरुण आणि तरुणींपेक्षा परदेशात व्यवसाय असणार्‍या कुटुंबांशी संबंध असलेल्या मुलांचा मोठा भरणा आहे. हे तरुण उच्चशिक्षित आहेत. त्यांना सोशय मीडिया आणि तंत्रज्ञान यांची चांगलीच माहिती आहे आणि त्यांनी पंजाबात हिंसाचार घडवण्यासाठी तयार केलेले अड्डे किंवा ग्लोब्युल हे ऑन लाईन चालवले जातात. त्यामुळे त्यांचा मागमूसही लागत नाही. यात काही मुलीही आहेत. या सर्व लोेकांच्या मनावर धर्माच्या आचरणापेक्षा पंथाभिनिवेश मोठा आहे आणि त्यांच्या मनावर खलिस्तान हा नवा स्वतंत्र देश झाला पाहिजे या विचाराचा मोठा पगडा आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यांत या संबंधात पोलिसांनी ४५ जणांना अटक केली असून त्यांची कडक तपासणी केली आहे आणि त्यांची राज्यांत हिंसाचार घडवण्याची पद्धती कशी आहे याचा तलास केला आहे. त्यातून असे निष्पन्न झाले आहे की त्यांची सारी सूत्रे परदेशातून हलवली जात असून त्यांना काही लोकांना ठरवून मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातूनच या तरुणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे नेते, ख्रिश्‍चन धर्मप्रसारक, डेरा सच्चा सौदाचे साधू यांना लक्ष्य केले आहे. अशा धार्मिक नेत्यांच्या हत्या केल्या की राज्यात धार्मिक उन्माद निर्माण होतो आणि आपोआप हिंसाचाराचे सत्र सुरू होते. त्या हेतूनेच त्यांनी गेल्या पाच सहा महिन्यांत आठ जणांच्या हत्या केल्या आहेत. या लोकांचा स्थानिक जनेतवर कसलाही संबंध नसल्याने ते या कामात कितपत यशस्वी होतील याबाबत संशय आहे मात्र यातून १९९० च्या दशकात उसळला तसा हिंसाचार उसळू नये याबाबत पोलीस सज्ज आहेत.

Leave a Comment